Fri Apr 04 07:01:06 IST 2025
नागपूर : भारतीय वायू दलासाठी आवश्यक असलेल्या एअरबसचे तंत्रज्ञान असलेल्या सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी अखेर बडोद्यात केली जाणार आहे. संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार यांनी याबाबतची घोषणा आज केली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या ३० ऑक्टोबरला होणार असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
एअरबस कंपनीची 'एअरबस डिफेन्स अँड स्पेस? आणि टाटाची 'टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड' हे संयुक्तरित्या बडोद्यात सी-२९५ या मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत. यानिमित्ताने आणखी एक मोठा प्रकल्प हा गुजरातमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
४ ते १० टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण ५६ सी-२९५ मालवाहू विमाने घेण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. यानुसार एअरबस, टाटा आणि भारतीय वायू दलात तब्बल अडीच अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. यानुसार एअरबस १६ मालवाहू विमाने ही थेट तयार करुन देणार आहे. तर उर्वरित ४० मालवाहू विमानांची निर्मिती आता बडोद्यात केली जाणार आहे.