Thu Feb 20 01:08:33 IST 2025
मुंबई: प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. बेनेगल किडनीच्या समस्येने त्रस्त होते, अलीकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी ९०वा वाढदिवस साजरा केला. १४ डिसेंबर रोजी त्यांनी ९०वा वाढदिवस साजरा केला होता, यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
बेनेगल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानात 'अंकुर' आणि 'निशांत' या चित्रपटांचा समावेश आहे. ते भारतीय सिनेविश्वात ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, श्याम बेनेगल यांनी मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात संध्याकाळी ६.३८ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणाऱ्या बेनेगल यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. समांतर चित्रपटसृष्टीचे प्रणेते असणाऱ्या बेनेगल यांनी मुख्य प्रवाहातील सिनेमे, तसेच आर्ट फिल्म्सच्या माधम्यातून वास्तववाद, सखोल अभ्यास आणि कथाकथनाची उत्कृष्टता दाखवून दिली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जाते आहे
बेनेगल यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात भारतीय समांतर चित्रपट चळवळीची सुरुवात केली. ज्याद्वारे वास्तववाद आणि सामाजिक बाबींवर भाष्य केले गेले. हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळण्यापूर्वी त्यांनी अनेक जाहिरात संस्थांसाठी काम केले होते. श्याम यांनी 'अंकुर' चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला ४३ पुरस्कार मिळाले, ज्यामध्ये राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश आहे. यानंतर त्यांनी 'मंथन', 'कलयुग', 'निशांत', 'आरोहण', 'भूमिका', 'जुनून' असे अनेक अविस्मरणीय चित्रपट केले. त्यांच्या कलेच्या क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल १९९१ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २००७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना सात वेळा सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, ज्यात अंकुर (१९७४), निशांत (१९७५), मंथन (१९७६), भूमिका (१९७७), मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६), जुबैदा (२००१) या सिनेमांचा समावेश आहे.