बिसलेरी कंपनी जाणार टाटा ग्रुपकडे

jitendra.dhabarde@gmail.com 2022-11-25 22:25:34.0
img

मुंबई : भारतातील सर्वात मोठी, बाटलीबंद पाणी विक्री करणाऱ्या बिसलेरी कंपनीचे मालक रमेश चौधरी यांनी टाटा ग्रुप बिसलेरी कंपनी खरेदी करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड, बिसलेरीची ६ ते ७ हजार कोटी रुपयात खरेदी करणार असून हा सर्व पैसा दान दिला जाणार असल्याचे उद्योजक आणि बिसलेरीचे मालक रमेश चौधरी यांनी सांगितले.

या व्यवहारासंदर्भात या दोन कंपन्यात सुरु असलेली बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे समजते. बिसलेरी कंपनीची विक्री करण्यामागचे कारण मात्र थोडे अजब म्हणावे लागेल. रमेश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे वय ८२ वर्षांचे झाले असून तब्येतीच्या काही तक्रारी सुरु आहेत. त्यांची एकमेव वारस असलेल्या जयंती यांना या व्यवसायात रस नाही. त्यामुळे बिसलेरीचा विस्तार आणि वाढ करण्यास कुणी उत्तराधिकारी नाही. अश्या परिस्थितीत चौधरी यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेणे सोपे नव्हते असे सांगितले जात आहे.

इकोनॉमीक टाईम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार बिसलेरी विकत घेण्यात अन्य अनेक कंपन्यांना रस होता. काही वर्षांपूर्वी रिलायंस रिटेल, नेस्ले, डेनोम यांनी वेळोवेळी बिसलेरी मध्ये रुची दाखविली होती. रमेश चौधरी आणि टाटा ग्रुप मध्ये गेली दोन वर्षे या संदर्भात बोलणी होत आहेत. टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्र्शेखारन आणि टाटा कन्झ्युमरचे सीईओ सुनील डिसुझा यांच्याशी बोलणी झाल्यावर कंपनी टाटा ग्रुपला देण्याचा निर्णय चौधरी यांनी घेतल्याचे समजते. रमेश कंपनीचा सर्व शेअर टाटा ग्रुपला देणार आहेत. कंपनीचा विस्तार करण्यास टाटा योग्य पर्याय असल्याचे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे. वयाच्या २७ व्या वर्षी रमेश चौधरी यांनी भारतीय बाजारात मिनरल वॉटर सादर केले होते आणि त्यातून या क्षेत्रातील बिसलेरी ही देशातील सर्वात मोठी कंपनी त्यांनी उभी केली. त्यांची कन्या जयंती कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत पण त्यांना व्यवसायात रस नाही. कंपनीच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर रमेश चौधरी जलसंधारण, प्लास्टिक रिसायकल, पर्यावरण क्षेत्रात काम करणार आहेत असे समजते.

Related Post