Fri Nov 22 04:24:50 IST 2024
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. काल त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. पण विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या पोटात पाणी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारण होत असल्याची बातमी समोर आली होती. पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. विक्रम गोखले यांनी डोळे उघडले असून उद्या त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढलं जाऊ शकतं. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया ही स्थिर आहे, असं जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितलं होतं. आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
विक्रम गोखले काही महिन्यांआधीच स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेच्या निमित्तानं विक्रम गोखले अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. विक्रम गोखले यांनी तुझेच मी गीत गात आहे मालिकेत पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा साकारली होती. मालिका लोकप्रिय तर आहेच त्यासोबतच नव्या पिढीबरोबर काम करताना नेहमीच आनंद होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका अग्निहोत्र मध्ये विक्रम गोखले यांनी मोरेश्वर अग्निहोत्री यांची भूमिका साकारली होती. मोरेश्वर काकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आजही अग्निहोत्र ही मालिका प्रेक्षकांना आवडते.