'चाणक्‍य' नाटकात ट्रान्‍सजेंडर कलाकारांची अप्रतिम प्रस्‍तुती

jitendra.dhabarde@gmail.com 2022-12-06 20:35:10.0
img

नागपूर : ‍राजनीती, अर्थनीती व ज्योतिषाचार्यात पारंगत असलेल्या विष्‍णुगुप्‍त आर्य चाणक्यच्‍या राष्‍ट्रधर्माची शिकवण देणा-या 'चाणक्‍य' या महानाट्याचे प्रस्‍तुतीने नागपूरकर रसिक भारावले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या मध्‍य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाच्‍या चौथ्‍या दिवसाची सुरुवात सायंकाळी 6 वाजता 'जागर राष्‍ट्रभक्‍तीचा' या देशभक्‍तीपर गीताच्‍या कार्यक्रमाने झाली. श्‍याम देशपांडे यांच्‍या नेतृत्‍वातील गायकांनी विविध गीते सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोल गलांडे यांनी केले. त्‍यानंतर ट्रान्‍सजेंडर कलाकारांचे कार्यक्रम व नंतर 'चाणक्‍यनीती' साठी प्रसिद्ध असलेल्‍या आर्य चाणक्‍य यांच्‍यावर आधारित प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी दिग्‍दर्शित व अभिनीत 'चाणक्‍य' हे महानाट्य सादर करण्‍यात आले. सोमवारी झालेला हा या नाटकाचा 1780 वा प्रयोग होता. राष्ट्रधर्माशिवाय कुठलाच धर्म, कुठलीच नीती श्रेष्ठ न मानणारे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णुगुप्त आर्य चाणक्य. भारतात २३०० वर्षांपूर्वी एक मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय मार्गदर्शक, आक्रमक विधानातून नेमकेपणाने राष्ट्रीयतेची नीती शिकविणारे गुरू, विद्वेषी आणि लोभी राज्यांच्या खंडाखंडात विभागलेल्या भारतास एकसंध, एकछत्र राष्ट्रनिर्मितीसाठी 'शेंडीला गाठ बांधणार नाही' अशी प्रतिज्ञा करीत दासीपुत्र व शूद्र म्हणून हिणवलेल्या पराक्रमी चंद्रगुप्ताच्या नेतृत्वात आपली शपथ पूर्ण करणारे आर्यपुत्र कुलगुरू अशी ओळख असलेले चाणक्य या राष्ट्रधर्माची प्रेरणा जागविणाऱ्या या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे जाज्वल्य दर्शन सोमवारी नागपूरकरांना झाले. इ.पूर्व ३२० च्या काळात तक्षशिला, पाटलीपुत्र व मगधच्या राजकीय सारीपाटावर रंगलेला स्वार्थाचा डाव. अनेक देश पादाक्रांत करून झेलमच्या काठापर्यंत पोहोचलेले युनानी अलेक्झांडरचे आक्रमण आणि त्याच्याशी न लढताच पराभव व मांडलिकत्व पत्करलेले अंबी, धनानंदसारख्या राजांच्या कृतीने हा देश दुखावलेला होता. अशावेळी राजनीती, अर्थनीती व ज्योतिषाचार्यात पारंगत असलेल्या चाणक्य यांनी तक्षशिलेचे कुलगुरूपद त्यागून चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वात एकछत्र राष्ट्रनिर्मितीस पुढाकार घेतला व बुद्धिकौशल्याने हा प्रण पूर्णही केला. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा वेगवान प्रवास मनोज जोशी व कलावंतांनी चाणक्य या महानाट्यातून सादर केला. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रसिद्ध उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते सत्‍यनारायण नुवाल, माजी खासदार अजय संचेती, हितवादचे मॅनेजिंग डायरेक्‍टर राजेंद्र पुरोहित, नागपूर सुधार प्रन्‍यासचे मनोज सुर्यवंशी, प्रसिद्ध व्‍यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते विलास काळे, किन्‍नर महामंडळाच्‍या महाराष्‍ट्र प्रदेश सदस्‍य राणी ढवळे यांची उपस्‍थ‍िती होती. यावेळी प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांचा तसेच ट्रान्‍सजेंडर कलाकारांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले. नितीन गडकरी म्‍हणाले, आज आनंदाचा क्षण की आपल्‍या व्‍यासपीठावर समाजातील अन्‍यायग्रस्‍त घटकांना मानाने व सन्‍मानाने आपली कला सादर करण्‍याची संधी मिळाली. समाजातील शोष‍ित, वंचित, पिडीतांना समान संधी मिळाली पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. तोच धागा पकडून खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात समाजातील सर्व स्‍तरातील लोकांना संधी देण्‍याचा आयोजन समितीचा उद्देश आहे, अे नितीन गडकरी म्‍हणाले.

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे. बालकलाकारांपासून ते राष्‍ट्रीय-आंतराष्‍ट्रीय स्‍तरावर कलाकारांपर्यंत, दिव्‍यांग, सेवावस्‍तील मुलांपासून ते ट्रान्‍सजेंडर अशा सर्वांना मंच मिळावा या उद्देशाने प्रेरित खासदार सांस्कृतिक महोत्‍सवात चौथ्‍या दिवशी मिशन विश्‍व ममत्‍व फाउंडेशरच्‍या ट्रान्‍सजेंडर कलाकारांना अप्रतिम नृत्‍य सादर करून रसिकांना अचंबित केले. मुद्रा डान्‍स अकादमीमध्‍ये तयार झालेल्‍या 15 ट्रान्‍सजेंडर कलाकार सहभागी झाले होते. राजस्‍थानातील घुमर नृत्‍याने कार्यक्रमाने सुरुवात केली. उत्‍तरप्रदेशातील मोहे रंग दो लाल, पंजाबचे भांगडा, गुजरातचे पिया रे पिया रे, महाराष्‍ट्राची लावणी अशा व‍िव‍िध गाण्‍यांवर या कलाकारांनी नृत्‍य सादर केले. कार्यक्रमाचा शेवट विविधतेने नटलेल्‍या भारतमातेला वंदन करण्‍याकरिता 'वंदेमातरम' या गीताने केला. श्रद्धा जोशी व जयश्री बारई यांच्‍या नेतृत्‍वातील या कलाकारांनी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात संधी दिल्‍याबद्दल आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूऋसंचाल स्‍वरा व‍िश्‍वास यांनी सूत्रसंचालन केले.

Related Post