Sun Nov 24 23:40:18 IST 2024
नागपूर : नव्वदीच्या दशकातील अतिशय सुरेल गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी आपल्या जादुई आवाजाने त्याकाळी भारतीय मनांवर मोहिनी घातली होती. त्याच जादुई आवाजाची अनुभूती शनिवारी परत एकदा नागपूरकरांना अनुभवायला मिळाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री कविता कृष्णमूर्ती यांची 'लाईव्ह इन कॉन्सर्ट' पार पडली. नागपुरात याआधीही अनेकदा येण्याची संधी मिळाली. येथील लोक शास्त्रीय संगीताचे जाणकार आहेत. त्यांच्यासमोर गाताना खूप आनंद मिळतो असे सांगताना कविता कृष्णमूर्ती यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. लता मंगेशकर यांची गाणी ऐकून मोठी झाले. त्या माझ्या गुरू आहेत आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी मला पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांच्याच गीतांनी कार्यक्रमाला सुरुवात करते असे म्हणत त्यांनी लता मंगेशकर यांना या गीताने स्वरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी प्यार हुआ छुपकेसे हे गीत सादर केले. जावेद अख्तर यांनी लिहिलेले अतिशय खोडकर गीत श्रीदेवीवर चित्रित केलेले हवा हवाई हे गीतही आज साठाव्या वर्षातही कविता कृष्णमूर्ती यांनी त्याच खोडकरपणे सादर केले. या गाण्याला भरपूर टाळ्या आणि वन्समोअर मिळाला. झुबेदा चित्रपटातील गीत पिया रे, श्रावणात घननिळा, बेदर्दी बालमा, रिमझिम, आज मै उपर आसमां निचे, निंबुडा, जब कोई बात, ये जवानी हे दिवानी, जग घुमिया, बोले चुडियां, तु ही रे, कोई मिल गया, बिन तेरे अशा अनेक लोकप्रिय गीते त्यांनी सादर केली. रसिकांना त्यांना भरभरून दाद दिली. कुमार सानू यांचा मुलगा युवा गायक जान कुमार सानू ने धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. कुमार सानू यांची सोचेंगे तुम्हे प्यार, सासों में बडी बेकरारी इत्यादी गाणी सादर करून त्याने रसिकांच्या हृदयाला साद घातली. आजच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मेजर जनरल दिनेश हुड्डा, डब्ल्यूसीएलचे सीएमडी मनोज कुमार, डॉ. मदन कापरे, माजी आमदार मितेश भांगडिया, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे अध्यक्ष रमेश दुरुगकर, अशोक मोखा, किशोर चिद्दरवार, सुरेश चिचघरे, चंद्रपाल चौकसे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कीबोर्ड वादक भोला घोष, नृत्यगुरू ललिता हरदास, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर ठेंगडी, नाट्यलेखक उदयन ब्रह्म, पारंपरिक हातमाग कलाकार पांडुरंग निमजे, रंगकर्मी श्याम आस्करकर व नितीन पात्रीकर, सप्तखंजरी वादक चेतन बेले, प्रभावी वक्ते अमोल पुसरकर, नृत्यगुरू स्वाती भालेराव, गायिका गौरी शिंदे, उत्कृष्ट वक्ते व शिक्षक अनंत ढोले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.
शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याने रसिकांना रिझवले खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दहाव्या दिवशी कथक नृत्यांगना निलाक्षी खंडकर यांनी कथक नृत्य सादर करीत तर सायली व मनस्वी उजवणे या दोन बहिणींना उपशास्त्रीय गीतांवर नृत्य सादर करीत रसिकांना रिझवले. गुरू डॉ. साधना नाफडे व पं. राजेंद्र गंगाणी यांच्या शिष्या निलाक्षी यांनी सुरुवातीला राजस्थानी बंदीश 'पधारो म्हारो देश' वर व त्यानंतर तराणा व सरगम वर अप्रतिम कथक नृत्य सादर केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेती सायली उजवणे व तिची बहीण मनस्वी यांनी 'सत्यम शिवम सुंदरम?, ?भोर भये पनघट पे?, ?मन क्यूं बहका? या गीतावर नृत्य सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. तत्पूर्वी, प्रसिद्ध गायक श्याम देशपांडे यांच्या संगीत संयोजनात गायकांनी देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन स्मिता खनगई यांनी केले. खासदार सांस्कृतिक महोत्सवाला दरवर्षी भरघोस प्रतिसाद देत असल्याबद्दल नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना धन्यवाद दिले. साहित्य, नाट्य, संगीत, नृत्याच्या क्षेत्रात नागपूर, विदर्भातील कलांवतांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांचा यानिमित्ताने सम्मान करण्याची संधी मिळते आहे. यावर्षी सुमारे पाच हजार स्थानिक कलावंतांना या मंचावर आपल्या कला अतिशय उत्कृष्टपणे सादर केल्या. त्यांचाही नागपूरकरांनी मनमुराद आस्वाद घेतला, असे नितीन गडकरी म्हणाले.