Fri Nov 22 05:20:48 IST 2024
जालना : मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे यांची देखील आता जालन्यात भव्य सभा (Jarange vs Bhujbal) आयोजित करण्यात आली आहे. येत्या १ डिसेंबर रोजी जालना शहरात ही सभा होणार आहे.
मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता आणखीनच वाढताना पाहायला मिळत आहे. ज्या जालन्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची लढाई सुरु केली, त्याच जालन्यात ओबीसी सभा घेत भुजबळ यांनी जरांगे यांना आव्हान दिले. त्यामुळे आता भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्याच जालन्यात जरांगे यांची जालना शहरातील आझाद मैदानात ही सभा आयोजित करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या अनेक जिल्ह्यात सभा झाल्या आहेत. यापूर्वी आंतरवाली सराटीत राज्याची सभा झाली. पण जालना जिल्ह्यासाठीची जरांगे यांची अजून एकही सभा झाली नाही. त्यातच, जालना जिल्ह्यात येऊन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे. त्यामुळे या सभेस मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेणार आहे. मनोज जरांगे पाटलांची जालना शहरात आयोजित ही सभा मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
शहरात आयोजित या सभेच्या दिवशी व्यापारी बांधवांचे नुकसान होऊ नये याकरीता कुठल्याही बंदचे आवाहन करण्यात येणार नाही. सभेपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य रॅलीही रॅली काढण्यात येईल. जिल्ह्यात व शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल याबाबतचे नियोजन सदर बैठकीत करण्यात आले. या बैठकीस मराठा समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.