Fri Nov 22 06:08:13 IST 2024
नागपूर : शरद पवार गट (Sharad Pawar Group) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) विरोधात आक्रमक झाला आहे. प्रफुल पटेल (MP Praful Patel) यांच्याविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गट आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपतींची भेट घेतली आहे.
दरम्यान, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे (Supriya Sule), शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांचा समावेश आहे. प्रफुल पटेल यांचं राज्यसभेच सदस्यत्व रद्द करण्यात यावं, या मागणीसाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं थेट राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड (Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. 4 महिन्यांपूर्वी दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मागणी करून देखील कारवाई न झाल्यानं शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जयदीप धनकड यांना पत्राच्या माध्यमातून आठवण देखील करून देण्यात आली होती.
वंदना चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांची भेट घेतली. चार महिन्यांपूर्वी आम्ही पत्र दिलेलं, त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, याबाबतही धनकड यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.