Tue Dec 16 08:09:57 IST 2025
नागपूर : ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टीव्हलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय फेस्टीव्हल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत कानसेन मोजिदा होते. यावेळी ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख तथा ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला पुढच्या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विकास कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची जगभरात ओळख निर्माण होत असून अनेक सामाजिक व विकास कार्य होत असल्याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
जपानच्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे यावेळी अभिनंदन करीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील 'फूड कोर्ट' चा शुभारंभ करण्यात आला परिसरात येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यामुळे परिसरात उपलब्ध होणार आहेत.