Fri Apr 04 06:53:11 IST 2025
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. भरत गोगावलेंचा व्हीप योग्य असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता मिळाली आहे.
सुनावणीवेळी ठाकरे गटाचे सुनिल प्रभू, अंबादस दानवे, वैभव नाईक, सुनिल शिंदे तर शिंदे गटाचे राहूल शेवाळे, मंगेश कुडाळकर,भरत गोगावले,बालाजी किणीकर,संजय शिरसाठ उपस्थित होते. शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे सुरुवातीला 16 आमदारासोबत गुवाहाटीला गेले होते. या मोठ्या घडामोडीने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि महावीकास आघाडीसरकार कोसळलं. यानंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर, शिंदे गटानेही उद्धव ठाकरे गटातील 14 आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी कोर्टात धाव घेतली. यावर तब्बल दीड वर्ष सूनवणी झाली.
शिवसेनेत 2022 मध्ये बंडखोरी झाली. एकनाथ यांच्याबरोबर 40 आमदारांनी बंड केलं. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाने एकमेकांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रता नोटीस सादर केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज निकाल देण्यात आला.