Fri Apr 04 07:06:36 IST 2025
मुंबई : मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली संपवत आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत काँग्रेसमधील सहकाऱ्यांसह प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते.
आपल्या सर्वांना माहिती आहे की माझं राजकारण, सकारात्मक, रचनात्मक, विकासात्मक राहिलेलं आहे. माझी विचारधारा सर्वसामान्य लोकांची सेवा करणं हे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहेत. महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना माहिती आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांचे ध्येय मोठं आहे. त्यासाठी आज त्यांचे हात बळकट करायचे आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे मोठं व्हिजन आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे आहेत. माझं शिवसेनेशी नातं जुनं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं माझे वडील मुरली देवरा महापौर बनले, असं मिलिंद देवरा म्हणाले. एकनाथ शिंदे त्यांच्या मेहनतीनं वर्षा बंगल्यापर्यंत आले आहेत. राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा ही एक विचारधारा आहे.माझ्यावर चुकीचे आरोप होण्याआधी एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षात प्रवेशाचं आमंत्रण दिलं. शिंदेसाहेबांना महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी काम करणारी प्रामाणिक मत आहे. खासदार होऊन मी चांगलं काम करु शकतो, असं मत शिंदे यांचं आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानतो, असं मिलिंद देवरा म्हणाले. सकाळपासून अनेकांचे फोन आले, काँग्रेससोबतचे नातं का तोडलं, असं विचारलं गेलं. १९६८ ची काँग्रेस, २००८ ची काँग्रेस आणि आजच्या काँग्रेसमध्ये अंतर आहे. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सकारात्मक सूचनांना प्रतिसाद दिला असता तर मला हा निर्णय घ्यावा लागला नसता, असं मिलिंद देवरा म्हणाले.
काँग्रेस आज उद्योगपतींना देशविरोधी म्हणत आहे. मोदीजी जे सांगतात त्याच्या ते विरोधात असतात. मोदी काँग्रेस चांगलं आहे, असं म्हणाले तर काँग्रेसवाले त्याचा विरोध करतील, असं मिलिंद देवरा म्हणाले. केंद्रात आणि राज्यात मजबूत सरकारची आवश्यकता आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र आणि मुंबईला पुढं घेऊन जायचं आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीनं एकनाथ शिंदे यांचं आभार मानतो, असं मिलिंद देवरा म्हणाले. गेल्या दहा वर्षात मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. याचं कारण नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे आहेत, असं देवरा म्हणाले.