Fri Apr 04 06:52:21 IST 2025
नागपूर : केंद्र सरकारने स्टार्टअप इंडियाची घोषणा केल्यानंतर मागील सात वर्षांत स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्टार्टअप सुरू होत आहेत. आज स्टार्टअप हे भारतीय अर्थव्यवस्था चालविणारे इंधन ठरत आहे, अशी भावना स्टार्टअप विषयावरील पॅनेल डिस्कशनमध्ये सहभागी झालेल्या तत्ज्ञांनी व्यक्त केली.
खासदार औद्योगिक महोत्सव - अॅडव्हांटेज विदर्भ या विदर्भातील गुंतवणुकीला गती देणाऱ्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ?स्टार्टअप? वरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ममाअर्थचे सहसंस्थापक वरुण अलग, कलारी कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक वाणी कोला यांचा सहभाग होता. नावीन्यपूर्ण संकल्पनांद्वारे आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या स्टार्टअप्सचे महत्त्व सरकारने ओळखले आहे. स्टार्टअप्सना आर्थिक, पायाभूत सुविधा आणि नियामक सहाय्य प्रदान करण्यासाठी विविध मंत्रालये आणि विभागांनी योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने स्टार्टअप इंडियाची घोषणा केल्यानंतर मागील सात वर्षांत स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्टार्टअप सुरू होताहेत. या संधीचा लाभ घेत उद्यमींनी स्वत:च्या नवसंकल्पांना मूर्त स्वरूप देण्याची गरज तत्जांनी व्यक्त केली. छोट्या शहरांना अधिक संधी स्टार्टअप आता केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. उलट येणारे दशक स्टार्टअपच्या दृष्टीने छोट्या शहरांसाठी लाभदायी ठरणार आहे. ग्रामीण भारतातील रहिवासीदेखील डिजिटली साक्षर झाले आहेत. आजघडीला भारतात १ लाख १० हजारहून अधिक स्टार्टअप यशस्वीरित्या कार्यरत आहेत. भारतीय मानसिकता लक्षात घेता भविष्यात स्टार्टअप क्षेत्र अधिक गती पकडणार आहे, अशी माहिती कलारी कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक वाणी कोला यांनी दिली.
ऐतिहासिक वारशाचे केले ब्रॅण्डिंग भारतीय संस्कृती ही पाच हजार वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येते. इतक्या जुन्या ऐतिहासिक वारशामध्ये सौंदर्य खुलविण्यासाठी विविध नुस्खे सांगण्यात आले आहेत. ती माहिती पिढ्यानपिढ्या वारसारुपाने मिळत आहे. या ऐतिहासिक वारशाचे चांगले ब्रॅण्डिंग करता येणे शक्य असल्याचे जाणवले आणि त्यातूनच आज उबटण फेसवॉश वा फेसमास्क यांसारखी उत्पादने सर्वाधिक विकल्या जात असल्याचे ममाअर्थचे सहसंस्थापक वरुण अलग म्हणाले. त्यांनी यावेळी सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील उलाढाल तसेच स्टार्टअपची दशा आणि दिशा याबाबत मार्गदर्शन केले.