Fri Apr 04 06:51:31 IST 2025
नागपूर : जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद (BJP National President) रिक्त आहे. या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करुन भाजप पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेची मोट पुन्हा नव्याने बांधायची असल्याचे फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. त्यासाठी मला राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी विनंती फडणवीसांनी केली होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना आता थेट दिल्लीतच बोलावून घेण्याची योजना आखल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे. संघटन कौशल्य, निवडणुकीची रणनीती आखण्याचा भाग असो किंवा कोणत्याही राजकीय संकटातून पक्षाला सहीसलामत बाहेर काढण्याचा विषय असो, या सगळ्याबाबत सध्याच्या घडीला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करणारे मोजके नेते आहेत.
फडणवीसांचा हाच आवाका आणि क्षमतांचा वापर राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटनेसाठी करुन घेता येईल, अशी भाजप नेतृत्त्वाची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला कधी बोलावले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.