Fri Nov 22 03:12:14 IST 2024
मुंबई : ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. मागील दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
विजय कदम यांनी नाट्यसृष्टीमध्येही बरेच काम केलं. मराठी नाट्यसृष्टीसाठी सतत झटणाऱ्या आणि वेगवेगळ्या कारणांसाठी कायम पुढाकार घेत नाटक आणि नाटकांशीसंबंधीत व्यक्तींसाठी झटणाऱ्यांमध्ये विजय कदम आघाडीवर होते. विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टीने एक सच्चा पाईक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विजय कदम यांच्या निधनाच्या वृत्ताला ज्येष्ट चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी दुजोरा दिला आहे. दुपारी दोन वाजता अंधेरीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत.
'टूरटूर', 'सही दे सही', 'विच्छा माझी पुरी करा', 'पप्पा सांगा कुणाचे' अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून विजय कदम यांनी कायम लक्षात राहतील अशा भूमिका केल्या. मराठी चित्रपटांमध्ये 1980 ते 1990 दरम्यानच्या दशकात विजय कदम यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. अनेक मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. काही काळापूर्वी त्यांनी 'ती परत आलीये' या मालिकेत 'बाबुराव तांडेल' ही व्यक्तिरेखा साकारली होती. मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या आणि आपल्या छोट्या छोट्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कलाकारांमध्ये विजय कदम यांचं नाव आजही आवर्जून घेतलं जातं. 1980 आणि 1990 दरम्यानच्या दशकात ते मराठी चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने गावतले. आपल्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी उत्तम पद्धतीने वापर करुन घेतला. त्यांनी फार मन लावून आणि मुख्य प्रवाहात राहत निर्मळ विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवलं. मात्र त्याचवेळी त्यांनी अनेक गंभीर भूमिकाही साकारल्या. आपल्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या मोठ्या आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारणाऱ्या विजय कदम यांनी मागील काही वर्षांमध्ये आपल्या करीअरमधील काही सर्वोत्तम आणि अजरामर अशा भूमिका साकारल्या. त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावे घ्यायची झाल्यास आनंदी आनंद (1987), तेरे मेरे सपने (1996), देखणी बायको नम्याची (2001), रेवती (2005), टोपी घला रे (2010), ब्लफमास्टर (2012), भेट तुजी माजी (2013) आणि मंकी बात (2018) या चित्रपटांचा उल्लेख करता येईल.