Fri Nov 22 03:53:39 IST 2024
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या प्रवर्गातील जातीचे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात भारत बंद पुकारण्यात आला. या अंतर्गत बुधवारी रामनगरात रॅली काढण्यात आली.
बहुजन विचार मंचचे नरेंद्र जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजबांधवांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. अनुसूचित जाती व जमातीला संविधानाप्रमाणे जातवार आरक्षण दिले. हे आरक्षण गरिबी निर्मूलनासाठी नसून सामाजिक समानतेसाठी, दर्जा वाढविण्यासाठी दिलेली संधी आहे. पण १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अनुसूचित जाती व जमातीचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करावे तसेच आर्थिक निकषानुसार आरक्षण देण्याचे अधिकार राज्य शासनाला दिले. या निर्णयामुळे जाती-जातींमध्ये भांडणे लागतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे राज्य शासनाने अ, ब, क, ड आणि आर्थिक निकषानुसार आरक्षण लागू करू नये, आरक्षणाला कायमस्वरूपी संरक्षण द्यावे या मागणीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील समाजबांधवांनी रामनगरातून रॅली काढली.
ही रॅली पुढे गोकुळपेठ, कॉफी हाऊस चौक, लक्ष्मीभुवन चौक, शंकरनगर चौकातून परत रानगरात परतली. रॅलीदरम्यान समाजबांधवांनी घोषणाबाजी करीत वातावरण तापविले. या रॅलीत सामाजिक कार्यकर्ते तथा बहुजन विचार मंचचे नरेंद्र जिचकार यांच्यासह विलास भालेकर, सुमित भालेकर, विराज ढोणे यांच्यासह समाजबांधवांची बहुसंख्य उपस्थिती होती.