Fri Apr 04 06:55:31 IST 2025
चंद्रपूर : अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज चंद्रपुरात बहुजन समता पर्वचे संयोजक डॉ. दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वात बंद करण्यात आला.
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीनं आज भारत बंदची घोषणा केली आहे. राजस्थानमधील एससी/एसटी समुदायांचा लक्षणीय पाठिंबा मिळालेल्या या बंदला देशभरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावलं उचलण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यांना एससी आणि एसटी गटांमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामागे सर्वाधिक गरजू लोकांना आरक्षण देण्याचं उद्दिष्ट आहे, मात्र विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे.
दलित आणि आदिवासी संघटनांशिवाय विविध राज्यांतील प्रादेशिक राजकीय पक्षही भारत बंदला पाठिंबा देत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, आझाद समाज पार्टी (काशीराम), भारत आदिवासी पार्टी, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल, लोजप (आर) आणि इतर संघटनांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसनंही बंदला पाठिंबा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असून तो मागे घेण्यात यावा, असं या संघटनांचं म्हणणं आहे.