Fri Feb 21 15:13:07 IST 2025
नागपूर : श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि तरुण भारतचे माजी कार्यकारी संपादक बबन वाळके यांचे आज गुरुवारी सकाळी खाजगी इस्पतळात निधन झाले. त्यांचे वय 68 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रंजना, दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे.
गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर किंग्ज वे रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास दोन वेळा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार केला जाणार आहे. अंत्ययात्रा रजतहिल अपार्टमेंट, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या बाजूला, अमरावती रोड येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.
पत्रकार संघाचे ते अध्यक्ष असतानाच टिळक पत्रकार भवनाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन तेव्हाचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते झाले होते. ते सरचिटणीसही राहिले होते. अन्यायाविरुद्ध लढणारा पत्रकार अशी त्यांची ओळख होती. पत्रकार संघाच्या अनेक लढ्यांमध्ये ते आघाडीवर होते. वार्ताहर ते कार्यकारी संपादक असा 30 वर्षांचा पत्रकारितेचा प्रवास त्यांनी तरुण भारतमध्ये केला. आकाशवाणीत न्यूज रीडर म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले. वार्ताहर आणि मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी क्राईम व कोर्ट हे दोन बीट अतिशय समर्थपणे सांभाळले. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. आपल्या दमदार लेखणीतून त्यांनी समाज आणि प्रशासनावर नेहमी छाप पाडली.