Thu Nov 21 23:27:44 IST 2024
अकोला : केवळ महिलांसाठी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज एका पुरुषाने भरल्याचं समोर आले आहे. सध्या या योजनेचा लाभ आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. छाननी करीत असतानाच पुरुषाने अर्ज भरल्याचे समोर आले. त्यानंतर हा अर्ज बाद करण्यात आला आहे. मात्र पुरुषाने या योजनेचा अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यात मध्य प्रदेशच्या धर्तीवर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्यानंतर राज्यात या योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळत आहे. राज्यात या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने महिलांकडून फॉर्म भरुन घेतले जात आहेत. राज्यातील लाखो महिलांनी या योजनेत आतापर्यंत अर्ज केले आहेत. 31 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. मात्र अकोल्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बनण्याचा प्रयत्न एका पुरुषाकडून करण्यात आला आहे. या पुरुषाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क अर्ज भरल्याचे समोर आले आहे. अकोला तालुक्यातील हा पुरुष असल्याचं छाननी दरम्यान उघडकीस आले आहे.
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. मात्र जी योजना केवळ महिलांसाठी असतांनाही या योजनेत पुरुषाकडून अर्ज भरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील हा पुरुष असल्याची माहिती आहे. दरम्यान पुरुष पात्र नसतानाही अर्ज भरण्यात आल्याने हा अर्ज आता रद्द करण्यात आला. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना पोर्टलवर महिलांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत पोर्टलवर आलेल्या जिल्ह्यातील महिलांच्या अर्जाची छाननी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये महिलांसाठी असलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत अकोला तालुक्यातील एका पुरुषाने अर्ज भरल्याचे समोर आले. संबंधित व्यक्तीचा अर्ज रद्द करण्यात आला असून, संबंधित व्यक्तीला नोटीस बजावून, महिलांच्या योजनेत अर्ज कसा भरला, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून विचारणा करण्यात येणार आहे.