Sun Nov 24 07:47:18 IST 2024
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते हे देशाच्या परमवैभवासाठी आवश्यक असलेली व्यवस्था उभे करत असतात. संपूर्ण देशाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळे हा विभाग म्हणजे देश उभारणीसाठीची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०२३-२४ वितरण सोहळा रविवारी सुरेश भट सभागृहात रविवार उत्साहात पार पडला. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटनकर-म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, सचिव सतीश कोळीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील तसेच, पायाभूत विकास महामंडळ सचिव विकास रामगुडे, सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे व राज्यभरातील बांधकाम विभागाचे पदाधिकारी, अभियंते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे अभियंते, वास्तुशास्त्रज्ञ, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा कुटुंबियांसह सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार वितरीत करण्यात आले. रविंद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ?इन्फ्रास्ट्रक्चर मॅन? असा उल्लेख करताना त्यांच्या या विभागातील कार्याचा गौरव केला. चव्हाण० म्हणाले, अभियंता म्हणून कर्तव्य करत असताना कामामधील त्रुटी शोधून, त्यावर उपाय योजणे, नियोजन व नंतर निर्मिती करणे हेच ध्येय समोर असले पाहिजे. परिवर्तनाच्या दिशेने जाणे फार गरजेचे असून गतिमान पद्धतीने काम करण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. तरच भविष्यात यश प्राप्त होईल. प्रकल्प व्यवस्थापन व त्याचे लाभ समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने विभाग काम करीत असून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून 100 टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विभागातील सर्वांचे सहकार्य लागणार असून विभागाची मान उंचावण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे ठरणार आहे, असे ते म्हणाले. अभियंता दिनाला केवळ कार्यक्रम साजरा न करता तो कर्तव्य दिवस म्हणून पाळावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. मनिषा पाटणकर ? म्हैसकर उपस्थित अभियंत्यांना संबोधित करताना म्हणाल्या, भारतरत्न डॉ. विश्वेश्वरया यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वाचा वारसा आपल्याला लाभला आहे. तो आपण आपल्या कार्याच्या माध्यमातून जपायचा असून हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आतापर्यंत राज्यस्तरीय अभियंता दिनाचा कार्यक्रम मुंबईत साजरा केला जात असे. पहिल्यांदाच तो विदर्भ-नागपुरात होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे विदर्भावरील प्रेम व आदर दिसून येते.
भारताच्या अमृतकाळात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे योगदान मोठे राहणार असून अनंत काळ टिकतील असे रस्ते, वास्तू निर्माण करणारा विभाग व गुणवत्ता, कार्यक्षमता आणि गतिमानता ही आपल्या विभागाची ओळख निर्माण होईल, असे आश्वासन मनिषा पाटणकर यांनी यावेळी दिले. पुरस्कार प्राप्त अभियंते व कर्मचा-यांचे अभिनंदन करताना सदाशिव साळुंखे यांनी डॉ. विश्वेश्वरय्या यांनी देशाला आपल्या कल्पक व दूरदृष्टीने देशाला नवी दिशा दिल्याचे सांगितले. आपल्या विभागासमोर यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रेरणेतून आपण त्या आव्हानांचा सामना सहजपणे करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय दशपुते म्हणाले, नवीन प्रकल्पांसाठी उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना दरवर्षी पुरस्कृत केले जाते. नव्याने विभागात नियुक्त झालेल्या 1500 अभियंत्यांसाठी हा कार्यक्रम जिद्दीने काम करण्यासाठी प्रेरणा देईल. दिनेश नंदनवार यांनी प्रास्ताविकातून भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कार्यावर प्रकाश टाकत भारताच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान राहिले असल्याचे सांगितले. विश्वेश्वरय्या यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्व अभियंते सचोटीने कार्य करतील व भारताच्या विकासात योगदान देतील, असे ते म्हणाले. दीप प्रज्वलन व डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पाची माहिती देणा-या कॉफीटेबल बुकचे विमोचन तसेच, दिनेश नंदनवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. परिसरात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटनदेखील रविंद्र चव्हाण हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी गलांडे-देशपांडे यांनी केले तर आभार जनार्धन भानुसे यांनी मानले.