Fri Nov 22 04:34:35 IST 2024
वेष्टन उद्योगात करिअर करण्यासाठी सरकारच्या ?इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग? म्हणजेच ?आयआयपी?तर्फे विविध अभ्यासक्रम सुरू केले जातात. वेष्टन तंत्रज्ञान क्षेत्रात दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर डिप्लोमाधारकांना नोकरी देण्याची १०० टक्के हमी ही संस्था देते.
विद्यार्थ्यांना योग्य आणि आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडता यावा, यासाठी या संस्थेत विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. आयआयपी संस्थेतर्फे दोन वर्षे मुदतीचे पूर्ण वेळेचे वेष्टन उद्योगात पदव्युत्तर डिप्लोमा (पीजीडीपी) अभ्यासक्रम घेतले जातात. हे अभ्यासक्रम विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रातील पदवीधरांसाठी उपलब्ध आहेत. संस्थेचे स्वत:चे अध्यापक तसेच पाहुण्या अध्यापकांमार्फत घेण्यात येणारे वर्ग आणि या उद्योगातील वेष्टनबंद प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांची प्रत्यक्ष ओळख होण्यासाठी मोठय़ा उत्पादन प्रकल्पांना दिलेल्या भेटी यांचा या अभ्यासक्रमात समावेश होतो. आयआयपीचा वेष्टन उद्योगातील पदव्युत्तर डिप्लोमा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि संलग्न विषयांतील पदवीधरांसाठी खुला आहे.
आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत हा अभ्यासक्रम घेऊन १२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्वच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्येच नोकऱ्यांचे होकार आले होते. हे अभ्यासक्रम मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद या चार प्रमुख शहरांमधून घेतले जातात. आयआयपीमध्ये इतर कमी मुदतीचे अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत; उदाहरणार्थ तीन महिन्यांचा पूर्ण लांबीचा सर्टिफिकेट कोर्स इन पॅकेजिंग (आयटीसी) आणि डिप्लोमा अंडर डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रॅम इन पॅकेजिंग (डीईपी) हा १८ महिन्यांचा दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम हे वार्षिक तत्तवावर घेतले जातात. नोकरी करणाऱ्या व अन्य विषयांत पदवीधर असणाऱ्या आणि व्यवसायाच्या गरजेपोटी पॅकेजिंग उद्योगाची माहिती आवश्यक असणाऱ्या व्यवस्थापकांसाठी १८ महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. एशियन पॅकेजिंग फेडरेशनने या डिप्लोमा अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.