Fri Nov 22 04:04:19 IST 2024
नागपूर : प्रशासकीय वैभवात भर घालणा-या जिल्हा नियोजन भवनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधींची विशेषत्वाने उपस्थिती होती. या नियोजन भवनातील सभागृहातच आज जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.
जिल्हा नियोजन भवनाच्या पहिल्या माळ्यावर जिल्हा नियोजन अधिकारी, नागपूर यांचे कार्यालय, सभागृहात व्यासपीठावर 28 मान्यवरांची आसन व्यवस्था व अधिकारी, प्रतिनिधी व इतर गणमान्य व्यक्तीकरिता 294 खुर्च्यांची आसन व्यवस्था आहे. दुसऱ्या माळ्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये 28 व्यक्तीकरिता बैठक व्यवस्था आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकरी व जिल्हा नियोजन अधिकारी यांना स्वतंत्र दालने या ठिकाणी आहेत. तळ माळ्यावर प्रतिक्षालय व दुसऱ्या माळ्यावर ग्रंथालयाची व्यवस्था आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सामाजिक न्याय विभागासह नवीन योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना विशेषत: तृतीयपंथीयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभाचे वाटप करुन आश्वस्त केले. यात प्रामुख्याने तृतीयपंथीयांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता देऊन तसे प्रमाणपत्र त्यांना बहाल केले. किन्नर विकास बहुउद्देशिय सामाजिक संस्था आता नागपूर येथून सामाजिक न्यायाचा नवा आयाम सुरु करीत आहे. याच बरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत दोन किन्नरांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अनुभवाची संधी दिली जाणार आहे. हे प्रमाणपत्रही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत बागायती, कोरडवाहू शेतीचे वाटप, स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील पात्र लाभार्थ्यांला 15 टक्के मार्जिन मनीचा लाभ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत तृतीयपंथीयांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूकीचे आदेश, शिवभोजन थाळी केंद्राचे तृतीयपंथीयाला वाटप, जिल्ह्यातील तालुकास्तरावरील 14 ठिकाणच्या तालुका कामगार सुविधा केंद्राचे लोकार्पण, तालुकास्तरावरील अग्निशमन वाहने यांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील जमाकुडो येथील आश्रमशाळेत शिकणारी खुशी रमेश वाढिवे व कल्याण बलदेव कोटवार या विद्यार्थींनीना नॅशनल लॉ स्कुल मध्ये प्रवेश मिळाला. लॉ स्कुलच्या नियमानुसार त्यांना लॅपटॉपची अट होती. हा नियम लक्षात घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील विविध स्थळांना अधोरेखित करणा-या ह्दयस्थ नागपूर या कॉफी टेबल बुकचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक साकारण्यात आले आहे.