Fri Nov 22 04:07:38 IST 2024
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संजय चिमुरकर यांनी मंगळवार, ६ ऑगस्टला सकाळी दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. अर्धा तास पाहणीत २० सप्टेंबर पर्यंत खोदकाम केलेली समतल होईल, या बेताने त्यांनी दिशानिर्देश दिले. त्यानुसार कंपनीचे कर्मचारी कामाला लागले आहेत.
दीक्षाभूमी परिसरात प्रस्तावित अंडरग्राऊंड पार्किंगसाठी सहा मीटर खोल खड्डा करण्यात आला. सिमेंट काँक्रिटीकरणानंतर २.५ मीटर खोलीत पिलर उभे करण्यात आले होते. जवळपास एक लाख वर्ग मीटरच्यावर परिसरात हे बांधकाम सुरू होते. दरम्यान २० जुलै रोजी मुसळधार आणि त्यानंतर सतत पाऊस पडल्याने येथील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचले होते. अग्निशमन विभाग आणि नागपूर सुधार प्रन्यासने युद्धपातळीवर काम करून केवळ सात दिवसांत पाण्याचा उपसा केला. या कामासाठी जवळपास दहाच्यावर मोटारपंप लागले.
पाण्याचा उपसा करून जागा समतल करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविले होते. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले होते. आजच्या पाहणी प्रसंगी एनएमआरडीएचे अधीक्षक अभियंता संजय चिमुरकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सुरक्षा अधिकारी सिद्धार्थ म्हैसकर आणि कंपनीचे अभियंता उपस्थित होते. सप्टेंबर २० पर्यंत जागा समतल खड्ड्यांतील लोखंडी रॉड कापून जागा समलत करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाणी झिरपू नये म्हणून आतमध्ये होल करण्यात येतील. येत्या २० सप्टेंबर पर्यंत संपूर्ण जागा समतल होईल, या दिशेने कामाचे निर्देश देण्यात आले आहेत.