Fri Apr 04 06:58:09 IST 2025
नागपूर : माध्यमांनी सर्वसामान्य नागरिकांना वन व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात मोलाचे योगदान दिले. वनसंवर्धन करताना वनमजुरांसह वनाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी मांडलेल्या सकारात्मक विषयांवर माध्यमांनी सतत प्रकाश टाकला आहे. देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविलेल्या विविध विषयांवर सविस्तर माहिती 'कांतार' या पुस्तकात आहे.
हे पुस्तक वन विभागाचे अधिकारी, कर्मचारीच नव्हे; तर माध्यमांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असून यात माहितीचा खजिना आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर यांनी आज येथे केले. राज्याच्या वन विभागाच्या मुख्यालयातील कमांड रुममध्ये डॉ. राजेश रामपूरकर लिखित व नाथे पब्लिकेशन लिमिटेड प्रकाशित 'कांतार - माध्यमांचे वनसंवर्धनात योगदान' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) शौमिता बिस्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन) श्रीनिवास राव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प) कल्याणकुमार, नाथे पब्लिकेशन लिमिटेडचे संचालक संजय नाथे, मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन, अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक जयतो बॅनर्जी, मुख्य वनसंरक्षक श्री. आर. एम. रामानुजन, वनसंरक्षक के. प्रदीपा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आदर्श रेडी, महेश टिकले उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ज्यांचे वन, वन्यप्राणी आणि जीवसृष्टीवर प्रेम आहे, अशा प्रत्येकासाठी हा बहुमूल्य दस्तऐवज आहे. प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे. या अन्नसाखळीतील एकही कडी कमजोर पडली तर संपूर्ण साखळी प्रभावित होते, हीच नेमकी गोष्ट सांगण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. एकंदरीत जीवन वाचविण्याची ही पुस्तकरूपी समृद्ध चळवळच आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले. संचालन व आभार डॉ. राजेश रामपूरकर यांनी मानले.