Fri Apr 04 06:58:07 IST 2025
मुंबई : महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. आधीच लोकशाहीची हत्या करून स्थापन झालेले हे सरकार कमिशनखोरीमध्ये गुंतलेले आहे. सरकारविरोधी कल स्पष्टपणे जनमाणसात दिसून येत आहे. एकदिलाने निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरणार आहोत, असा पुनरुच्चारही चेन्नीथला यांनी केला. केंद्र सरकारवरही त्यांनी चौफेर टीका केली. महायुतीला बहीण नव्हे तर सत्ता लाडकी असल्याची टीका थोरात यांनी केली.
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक भ्रष्ट म्हणून या सरकारची नोंद होईल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. महाविकास आघाडीत घटक पक्षांत कुणाला किती जागा मिळणार हे अजून ठरलेले नाही. लवकरच याचा निर्णय होईल. हे करताना आजवर ही जागा कोण लढवित आला यापेक्षा कुणाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हे पाहिले जाणार आहे. जागा वाटपासाठी मेरीट हाच निकष राहील, असा निर्णय बुलढाण्यातील प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी बुलढाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्याचा विधानसभा निवडणूकपूर्व आढावा घेतला. या बैठकीला विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यांच्यासह आमदार आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी चेन्नीथला यांनी बुलढाणा अर्बन रेसिडन्सीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकरी हिताच्या दृष्टीने कुठलीही ठोस पावले राज्यातील महायुती सरकारने उचलली नाहीत. रोजगाराच्या समस्या वाढत आहेत. केवळ पैसे खाण्यासाठी योजना आखून भ्रष्टाचाराचा कळस गाठला जात आहे. महायुतीचे हे राज्य सरकार कमिशनखोर आहे, असा आरोपही केला. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी महाविकास आघाडी एकदिलाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. लोकांचा विश्वास राज्य सरकारवरून उडाला आहे.
राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी २३३ कोटी रुपयांचा विकास आराखडा गेल्या पाच महिन्यांपासून सरकार दरबारी पडून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणून समुद्रात जलपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची एकही विट रचण्यात आली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिलच्या स्मारकासाठी पैसे दिले, पण खर्च एक रुपया केला नाही. त्यामुळे सरकारच्या कामाची अनास्था लक्षात येते, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.