एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये चार स्पेशॅलिटी क्लिनिकचे उद्घाटन संपन्न

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-02-07 21:48:44.0
img

नागपूर : एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथील मेडिसिन आणि पॅडियाट्रिक ओपीडी परिसरात चार स्पेशॅलिटी क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे सदस्य डॉ. विंकी रुघवानी यांच्या हस्ते करण्यात आले.

डायबेटिस क्लिनिक लाइफस्टाइल मॉडिफिकेशन क्लिनिक, एन्डोस्कोपी क्लिनिक आणि सिकलसेल क्लिनिक या चार खास क्लिनिकचे उद्घाटन यावेळी डीन डॉ. सजल मित्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डायरेक्टर -ए.ए., रेडिओलॉजीचे प्राध्यापक डॉ. काजल मित्रा, व्हाईस डीन डॉ. नितीन देवस्थळे, व्हाईस डीन डॉ. विलास ठोंबरे, जनरल मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. तनुजा मनोहर, बालरोग विभाग प्रमुख डॉ. अंजली एडबर, फिजिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. मनीष सवाने, डॉ नलिनी हुमणे, डॉ. सुनंदा चावजी, डॉ. अनिरुध्द देवके, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सुश्रुत फुलारे, मॅट्रॉन श्रीमती रीटा जॉन, डॉ. बनसोड, डॉ. होले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. डायबेटिक क्लिनिक मधुमेहाच्या रूग्णांच्या सर्वसमावेशक व्यवस्थापनास मदत करेल, ज्यामध्ये रक्तातील साखरेचे व्यवस्थापन, आहारतज्ञांचा आहार सल्ला, व्यायामासंबंधी सल्ला आणि मधुमेहाच्या विविध गुंतागुंती जसे की डोळ्यांची समस्या, मूत्रपिंड समस्या, हृदयाची समस्या, कोलेस्ट्रॉल समस्या, न्यूरोलॉजिकल समस्या इत्यादींसाठी स्क्रीनिंग आणि डायबेटिक फूट समस्या लवकर ओळखण्यासाठी विशेष उपकरणे आणि विशेष उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करेल आणि गॅंग्रीन व ॲम्प्युटेशन वर प्रतिबंध करेल.

फिजियोलॉजी विभागाने औषध विभागाच्या सहकार्याने सुरू केलेल्या जीवनशैली बदल क्लिनिकमध्ये, रुग्णांचे तपशीलवार इतिहास आणि प्रश्नावली, निदान ​​तपासणी आणि पोषण, शारीरिक क्रियाकलाप, झोप, तणाव पातळी, सामाजिक संपर्क आणि कोणतेही व्यसन यांच्या आधारे विशिष्ट तपासण्यांद्वारे संपूर्ण मूल्यांकन केले जाईल. योगावर विशेष भर देऊन रोग विशिष्ट जीवनशैली समुपदेशन आणि पाठपुरावा केला जाईल. सिकलसेल क्लिनिकमध्ये, जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी सिकलसेल रुग्णांना सर्वसमावेशक उपचार, समुपदेशन आणि समर्थन दिले जाईल. क्लिनिक प्रगत वैद्यकीय सुविधा आणि सिकलसेल व्यवस्थापनासाठी विशेष काळजी देते. रूग्णांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी ऑर्थोपेडिक काळजी, अनुवांशिक समुपदेशन आणि रूग्ण शिक्षण कार्यक्रम यांचा समावेश आहे. सिकलसेल रुग्णांना हायड्रोक्सिल युरिया आणि अत्याधुनिक जॉईंट रिप्लेसमेंट ची सुविधा दिल्या जाईल. यावेळी सुसज्ज गॅस्ट्रो इंटेस्टिनल एंडोस्कोपी क्लिनिकचे उद्घाटनही करण्यात आले. निदान तसेच उपचारात्मक एंडोस्कोपी स्वस्त दरात केल्या जातील.

Related Post