पद्म पुरस्कार मिळविण्यासाठी शिफारशीची गरज का? : ज्वाला गट्टा

2017-01-27 08:58:36.0
img

नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिने तिला पद्म पुरस्कार न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्वालाने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून याबद्दल भाष्य करताना पद्म पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी विराट कोहली, ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, ज्वाला गट्टा हिने या पुरस्कारासाठी तिसऱ्यांदा अर्ज करूनही तिला हा पुरस्कार मिळाला नाही.

यानंतर तिने पद्म पुरस्कारांच्या एकूण प्रक्रियेबद्दलच काही सवाल उपस्थित केले. देशातील मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या पुरस्कारासाठी अर्ज करावा लागतो, हेच मला काहीसे आश्चर्यकारक वाटते. मात्र, प्रक्रियेचा एक भाग म्हणून मी पुरस्कारासाठी अर्ज केला होता. माझ्या खेळामुळे देशातील लोकांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार असल्याने तो मिळावा, असे मला वाटत होते, अशा शब्दांत ज्वालाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related Post