Fri Apr 04 06:48:59 IST 2025
चेन्नई : माजी विश्वचॅम्पियन विश्वनाथन आनंदबाबत सध्या निवृत्तीच्या चर्चा रंगत आहेत. पण २०१७ मध्ये चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतरही या दिग्गज खेळाडूने सध्या तरी खेळ सोडण्याचा कुठलाही विचार केलेला नाही.
अमेरिकत सेंट लुईमध्ये आयोजित स्पर्धेपूर्वी ४७ वर्षीय आनंद काही कालावधीसाठी विश्रांती घेत आहे. अमेरिकेत आयोजित या स्पर्धेत सर्वांची नजर महान बुद्धिबळपटू गॅरी कास्परोव्हवर राहणार आहे. कास्परोव्ह सर्वांना चकित करीत पुनरागमन करीत आहे. आनंद सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवित आहे. अलीकडेच त्याने ३६ वर्षींय रॉजर फेडररने आठव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकाविताना बघितले आहे. स्वीत्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू फेडररने अलीकडेच १९वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविले. याबाबत बोलताना आनंद म्हणाला, मी विम्बल्डनमध्ये फेडररची लढत बघत होतो. अखेर ही अंतिम लढत एकतर्फीच ठरली. नव्या कार्यक्रमामुळे फेडररसाठी मोठा फरक पडला. क्ले कोर्टच्या पूर्ण मोसमामध्ये तो फ्रेंच ओपनमध्ये खेळला नाही आणि विम्बल्डनमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. जुलैमध्ये ग्रँड बुद्धिबळ टूरच्या ल्युवेन टप्प्यामध्ये आनंदला १० खेळाडूंमध्ये आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर स्पेनमधील लियोन येथे आपले १०वे विजेतेपद पटकाविण्याची संधीही गमावली.
आनंद पुनरागमन करणाऱ्या कास्परोव्हविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे. याबाबत बोलताना आनंद म्हणाला, त्याची कामगिरी कशी होती, याबाबत उत्सुकता आहे. त्याने अचानक पुनरागमन करण्याचा निर्णय घेतलेला नाही, असा मला विश्वास आहे. तो भावनेच्या भरात निर्णय घेण्याऱ्यांपैकी नाही. तो सेंट लुई स्पर्धेसाठी तयारी करीत असावा. सेंट लुई स्पर्धेनंतर आनंद बुद्धिबळ विश्वकप स्पर्धेची तयारी करणार आहे. विश्वकप स्पर्धा सप्टेंबर महिन्यात जॉर्जियामध्ये खेळली जाणार आहे. स्पर्धेतील अव्वल दोन खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट््स स्पर्धेसाठी पात्र ठरतील. त्यात २०१८ च्या विश्व चॅम्पियनशिपसाठी कार्लसनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. आनंदला पुरुष भारतीय खेळाडूंमध्ये पी. हरिकृष्णा, के. शशिकिरण, विदित गुजराती आणि बी. अधिबान तर महिलांमध्ये डी. हरिका यांच्याकडून मोठी आशा आहे. कोनेरू हम्पी चांगली खेळाडू आहे; पण गेल्या अनेक दिवसांपासून ती अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झालेली नाही. मी केवळ कसून मेहनत घेण्याची आशा करू शकतो. जिद्द असणे महत्त्वाचे असते. त्यात खडतर वेळेमध्ये आगेकूच करणे आवश्यक असते. आताही स्पर्धा जिंकण्याचा मला विश्वास आहे. मी चांगली कामगिरी करू शकतो. संभाव्य निवृत्तीबाबतच्या प्रश्नांमुळे त्रास होत नाही. आता मला या प्रश्नांची सवय झाली आहे. मी निराश होत नाही, असे विश्वनाथन आनंद म्हणाले.