Fri Apr 04 07:00:07 IST 2025
नागपूर : गाण्याच्या क्लासेसला जाणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची चीड आणणारी घटना राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील गुन्हेगारीच्या घटना चर्चेत असतानाच आता सामूहिक अत्याचाराची घटना घडल्यानं नागपूर हादरलं आहे. नराधमांनी पीडित तरुणीचं रामदास पेठेतून अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महिलांवरील अत्याचारांचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आलेला असताना पुन्हा एकदा गंभीर घटना घडली आहे. नागपूरमध्ये अपहरण करून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 19 वर्षी तरुणीचं नराधमांनी शहरातून अपहरण केलं आणि नंतर तिच्या सामूहिक अत्याचार केला. पीडित तरुणी गायनाचे क्लासेस करते. आज सकाळी (13 डिसेंबर) 11 वाजता तरुणी क्लासेसला जात होती. यावेळी आरोपींनी रामदास पेठ येथे तरुणीला गाठलं. आरोपींनी पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर नागपूर शहरातील कळमना परिसरात तरुणीला घेऊन गेले. कळमना परिसरात नेल्यानंतर आरोपींनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केले. गंभीर बाब म्हणजे हा सर्व प्रकार भरदिवसा घडला आहे. या घटनेची शहरात चर्चा होत आहे. दरम्यान, पीडितेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे. 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त पोलीस उपअधीक्षक सीताबर्डी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. याबाबत बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, अशी तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. एक तरुणीचं गाण्याच्या क्लासला जात असताना अपहरण करण्यात आलं. त्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल केला जात आहे. कुणालाही अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात असून, आताच या प्रकरणाबद्दल जास्त माहिती देता येणार नाही, असं अमितेश कुमार म्हणाले.