नागपुरात पहिले अॅग्रो कन्व्हेंशन सेंटर : नितीन गडकरी, अॅग्रो व्हिजनचा समारोप

jitendra.dhabarde@gmail.com 2021-12-27 20:19:56.0
img

नागपूर : देशातील पहिले अॅग्रो कन्व्हेंशन सेंटर नागपुरात साकारले जात असून दीडशे कोटींचा हा प्रकल्प राहणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अॅग्रो व्हिजनचा समारोपीय सोहळा सोमवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते.

खासदार रामदास तडस, माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार प्रा. अनील सोले, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संयोजक गिरीश गांधी, आयोजन सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर, राजेश बागडी प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी म्हाणाले की, शेतकऱ्यांना पिकांबाबत माहिती मिळावी यासाठी फुटाळा तलावालगत कृषी विद्यापिठाच्या जागेवर कन्व्हेंशन सेंटर उभारले जात आहे. त्यासाठीचा प्रकल्प अहवालही तयार असून १५ दिवसात सादर केला जाणार आहे. संपूर्ण देशासाठी ते प्रेरणेचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अॅग्रो व्हिजन केवळ प्रदर्शन न राहता नियमित चळवळ व्हावी, या दृष्टीने वर्धामार्गावर रेडीसन ब्ल्यू हॉटेल जवळील जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिथे नियमित प्रदर्शन सुरू राहील. याशिवायही अॅग्रो व्हिजन ट्रस्टद्वारे कायमस्वरूपी जागा खरेदी केली जात आहे. तिथे वर्षभऱ शेतकऱ्यांचे प्रशिक्षण सुरू राहील. सेंद्रीय शेती उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठही तिथे उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मिळून सुखी, समृद्ध शेतकरी हे स्वप्न साकार करू असा विश्वास त्यांनी दिला. खा. रामदास कदम यांनी शेती चांगला व्यवसाय असून नवनवीन प्रयोग मात्रआवश्यक असल्याचे सांगितले. अॅग्रोव्हिजन शेतकरी हिताचा उपक्रम असून शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होत असल्याचे सांगितले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.

फ्लेक्स इंजीनची वाहने लवकरच इथेनॉलवर चालणारी फ्लेक्स इंजिन असलेली वाहने लवकरच बाजारात येतील. यासंदर्भात शासनादेशही निर्गमित करण्यात आला आहे. वाहन निर्मत्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची तातडीने बैठकही घेणार आहे. तीन ते सहा महिन्यात ही वाहने विक्रीसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली. फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग सुरू होणार आहे. त्यामुळे ५० लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Post