पुढील ४८ तासांत कोसळणार अतिमुसळधार पाऊस

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-01-04 20:44:07
img

मुंबई : स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. परिणामी तापमानात वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. अशातच येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. लक्षद्वीपमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसासह (Heavy Rain) हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि कर्नाटक किनारी भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार आहे.

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असल्याने थंड वारे वाहत आहे. परिणामी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. तर काही जिल्ह्यात दाट धुक्याचा प्रभाव जाणवत आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी बाप्पयुक्त वारे वाहत असून हवेतील आद्रता कमी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

Related Post