Fri Nov 22 04:06:14 IST 2024
नागपूर : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्हयातील निवडक दोनशे प्रगतीशिल शेतक-यांचा अभ्यास दौरा आजपासून सुरू झाला असून आज या दौर्यास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर चे कार्यकारी संचालक श्री. राजेंद्र मोहिते यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला.
गोसीखुर्द प्रकल्पाचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी लाभधारकां शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पिक पध्दतीचा अभ्यास करून फायदेशीर पिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी दिनांक 25 मे ते 29 मे 2022 या कालावधीत शेतकरी समृध्दी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. राजेंद्र मोहिते यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज अभ्यास दौ-याला सुरूवात झाली. या प्रसंगी गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता श्री. जगत टाले, कार्यकारी अभियंता श्री. किशोर दमाह, श्री. सुहास मोरे आणि इतर अभियंते उपस्थित होते. गोसीखुर्द प्रकल्प पुर्णावस्थेकडे येतांना प्रकल्पाच्या पाण्याचा सुयोग्य वापर करावा व लाभधारक शेतक-यांनी पिक पध्दतीत बदल करून वैयक्तिक व राष्ट्रीय उत्पन्नात भर घालावी, या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी पंढरपूर, बारामती, इस्लामपूर, सांगोला, व सोलापूर या भागातील उस लागवड, आमराई फळ बाग, कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र, उस कारखाना व निवडक शेतांना भेट देवून पाहणी करणार आहेत. उस लागवडीमधील तज्ञ, कृषी रत्न श्री. संजय माने यांच्या शेताला भेट देवून त्यांचेही मार्गदर्शन गोसीखुर्द प्रकल्पाच्या लाभधारकांना मिळणार आहे. शनिवार दिनांक २८ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत.
गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांना प्रकल्पाच्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे आवाहन गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. आशिष देवगडे यांनी केले आहे.