झिम्बाब्वेने पाकिस्तानचा केला पराभव, T20 विश्वचषक

jitendra.dhabarde@gmail.com 2022-10-27 22:22:05.0
img

झिम्बाब्वेने ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा एका धावेने पराभव करून क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग खूपच कठीण झाला असून ते आता स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर झिम्बाब्वेने दोन सामन्यातील पहिल्या विजयासह आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

त्याचबरोबर झिम्बाब्वेने दोन सामन्यातील पहिल्या विजयासह आपल्या आशा जिवंत ठेवल्या. संघाच्या खात्यात आता तीन गुण आहेत. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 8 गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आणि त्यानंतर पाकिस्तानला 20 षटकांत 8 बाद 129 धावांवर रोखले. झिम्बाब्वेने दिलेल्या 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही खूपच खराब झाली. संघाने 23 धावांच्या स्कोअरवर कर्णधार बाबर आझम (4) आणि मोहम्मद रिझवान (14) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. पाकिस्तानला तिसरा धक्का इफ्तिखार अहमद (5) याच्या रूपाने 36 धावांवर बसला. यानंतर शान मसूद (44) आणि शादाब खान (17) यांनी चौथ्या विकेटसाठी 36 चेंडूत 52 धावांची भागीदारी करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर लगेचच सिकंदर रझाने आधी शादाब आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हैदर अलीला (0) बाद करून पाकिस्तानला सलग दोन धक्के दिले. त्यानंतर रझाने त्याच्या पुढच्याच षटकात मसूदला यष्टीचीत करून झिम्बाब्वेला मोठे यश मिळवून दिले. मसूदने 38 चेंडूत तीन चौकार मारून 44 धावा केल्या. शेवटच्या तीन षटकात पाकिस्तानला विजयासाठी 29 धावांची गरज होती, पण संघ एका धावेने विजयापासून दूर राहिला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने चार षटकांत 25 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय ब्रॅड इव्हान्सने दोन विकेट्स घेतल्या.

शेवटच्या 6 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती. ब्रॅड इव्हान्स गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नवाजने लाँग ऑफच्या फटका मारून तीन धावा घेतल्या. चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल असे वाटत होते पण झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकाने उत्तम क्षेत्ररक्षण केले आणि एक धाव वाचवली. पण त्यानंतर वसीमने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर तिस-या चेंडूवर 1 धाव चोरली. तर पुढचा चेंडू डॉट गेला. ब्रॅड इव्हान्सने आपल्या चतुराईने पुढच्या चेंडूवर नवाजला फटका मारण्यास उसकावले आणि त्याची विकेट घेतली. मिड ऑफला त्याचा झेल इर्विनने घेतला. अखेर शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदी क्रिझवर होता. शाहीनने ब्रॅडचा शेवटचा चेंडू मीडऑनला फटकावला आणि दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण दुसरी धाव घेताना शाहीन धाव बाद झाला. अशा प्रकारे झिम्बाब्वेने रोमांचक सामन्यात झुंझार विजय मिळवला.

Related Post