Fri Nov 22 04:32:47 IST 2024
नागपूर : छत्तीसगड येथील कोळसा खाण वाटपातील अनियमितता प्रकरणी विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांच्यासह सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. या आरोपींच्या शिक्षेवर 18 जुलैला सुनावणी होणार आहे.
कोळसा खाण प्रकरणात न्यायालयाने माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एचसी गुप्ता, केएस क्रोफा, के. सी. सामरिया या दोन अधिकाऱ्यांसह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या सगळ्यांना न्यायालयाने दोषी ठरवले. आयपीसी कलम 120 बी, 420 व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवले आहे. छत्तीसगडमधील फतेपुर खाणीचे कंत्राट जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
सीबीआयने 27 मार्च 2013 रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात या सर्वजणांनी गैरमार्गाने कोळसा खान आपल्या ताब्यात घेतल्याचा, असा आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआयने 20 नोव्हेंबर 2014 रोजी क्लोजर रिपोर्ट दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार देत प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने दर्डांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात चुकीच्या पद्धतीने तथ्यांना सादर केल्याचाही ठपका ठेवला होता. त्यामुळे आता या आरोपींच्या शिक्षेवर 18 जुलैला सुनावणी होणार आहे.