बँक व सेतू केंद्रानी पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी : देवेंद्र फडणवीस आज अखेरचा दिवस

jitendra.dhabarde@gmail.com 2023-08-02 23:22:52.0
img

नागपूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी 3 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उद्या शेवटचा दिवस असून नागपूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सर्व बँकांनी शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी उद्या शेवटच्या दिवशी सेतू केंद्र व बँकेत आपला अर्ज करावा. हा अर्ज करत असताना सेतू केंद्र अथवा बँकेत शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होणार नाही याची खबरदारी सर्व यंत्रणेने घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांनी आज या योजनेचा आढावा घेतला. उद्या शेवटचा दिवस असून जिल्ह्यातील शेतकरी यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व जिल्हास्तरावरील यंत्रणेने कार्यरत असावे, असे त्यांनी सांगितले आहे. कोणत्याही बँकेची यासंदर्भात तक्रार येता कामा नये. शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्यात यावे,अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची मुदत खरीप हंगामाकरिता 31 जुलै 2023 अशी होती. शासनामार्फत मुदतवाढ करून उद्या 3 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. सन 2023-24 पासून सर्व समावेशक पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. 2 ऑगस्टअखेर जिल्ह्यातील एकूण 1 लक्ष 98 हजार 41 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे.

बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा संरक्षण मिळण्यास दिनांक 3ऑगस्टअखेर नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हफ्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रासह विमा प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आपल्या नजीकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र मध्ये दिनांक 3 ऑगस्टपर्यन्त विमा हप्ता भरून सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले असून या योजनेसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी स्वत: पुढे येऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे .

Related Post