Fri Nov 22 05:03:54 IST 2024
मुंबई : मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखले. सरकारला सत्तेचा माज, निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला इशारा आहे.
मुंब्रा शिवसेना शाखेजवळ शनिवारी जोरदार राजकीय नाट्य पाहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटानं पाडलेल्या मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे तिथं आले होते. मात्र शिवसेना शाखेजवळ पोहोचण्याआधीच त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला... त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले. उद्धव ठाकरेंनी स्वतः गाडीबाहेर येऊन पोलीस अधिका-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही रस्त्यावर जमले होते. त्यांनी ठाकरेंना काळे झेंडे दाखवले.तब्बल अर्धा-पाऊण तास मुंब्र्याच्या रस्त्यावर हे नाट्य सुरू होतं. अखेर शाखेमध्ये न जाताच उद्धव ठाकरे माघारी परतले.
उद्धव ठाकरे मुंब्रा येथे पोहचले मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जावून शाखा पाडलेल्या परिसराची पाहणी करण्यास मज्जाव केला. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना पाहणी करण्याची परवानगी द्यावी यासाठी विनंती केली. पण पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जाऊ दिलं नाही. अखेर उद्धव ठाकरे यांनी लांबूनच शाखेची पाहणी केली आणि ते परत फिरले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.