राज्यात गुन्हे वाढले, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नापास, सुषमा अंधारेंची टीका

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-21 21:25:32.0
img

नागपूर : महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली असून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे नापास झाले आहेत अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

आज आलेली बातमी अस्वस्थ करणारी आज सकाळी आलेली बातमी अस्वस्थ करणारी आहे. येरवडा तुरुंगातला कुख्यात गुंड आशिष फरार झाल्याची बातमी आली आहे. आम्ही वारंवार तुरुंग प्रशासन, पोलीस खातं आहे त्यांच्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र अडचण अशी होते आहे की कैद्यांकडून पाकिटं घेऊन पोलीसच त्यांना कशी मदत करतात याचा व्हिडीओ पोस्ट केला तरीही कारवाई झालेली नाही. ड्रग्ज रॅकेट प्रकरणात डीन संजीव ठाकूर यांच्या नार्को चाचणीची मागणी आम्ही केली आहे. डीन संजीव ठाकूर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर आहेत हे सरकारने सांगितलं पाहिजे. पोलीस खातं काय पद्धतीने काम करतं आहे? कायदा सुव्यवस्था आपल्या राज्यात आहे का? कारण महिलांविषयीचे गुन्हे वाढले आहेत असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. सगळंच पोलिसांनी पाहायचं का? मुलींनी आत्मनिर्भर कधी व्हायचं असं जर सत्ताधारी पक्षातल्या महिला बोलत असतील तर त्यांनी लक्षात घ्यावं की डिसेंबर २०२२ पासूनच्या घटना मी सांगितल्या आहेत. मी त्यांचा पाठपुरावा करते आहे. त्या सगळ्या घटना शाळकरी मुलींसह घडल्या आहेत, एक घटना अंध मुलीसह घडली आहे. यात विशेष बाब म्हणजे या संपूर्ण कालावधीत पालकमंत्री म्हणून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असतानाही महिलांवर अत्याचार झाले. आता सत्ताधारी पक्षातल्या महिला पुढारी सांगत आहेत की सगळंच पोलिसांवर आणि सरकारवर कसं सोडता? मला सांगा पाच आणि सात वर्षांच्या मुलींनी कसं आत्मनिर्भर व्हायचं?

कल्याणमध्ये आम्ही जेव्हा सात वर्षांच्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला गेलो तेव्हा त्या चिमुकलीच्या फोटोसमोर नैवैद्य म्हणून मॅगी, चॉकलेट आणि फ्रुटी ठेवले होते. इतक्या छोट्या बाळांवर अत्याचार होतात, हत्या होतात गृहखातं काय करतं आहे? सराईत कैद्यांना सरकारी जावई असल्यासारखं वागवलं जातं आहे. आजच्या येरवड्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा गृहखात्याचे वाभाडे निघाले आहेत. राज्यातल्या गृहखात्याचा वचक उरलेला नाही. कारागृह निरीक्षक, महानिरीक्षक हे काय करत आहेत? गंभीर गुन्ह्यांचे आरोपी असणाऱ्यांकडे मोबाइल कसे जातात? त्यांना सोयी सुविधा कशा मिळतात? तुरुंग हे कैद्यांचं नंदनवन व्हायला कारणीभूत कोण आहे? याचं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले की ते म्हणतात तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. आम्ही तुमचं तोंड बंद करु. तोंड बंद करु म्हणजे काय? आमच्यावर खोट्या केसेस टाकू. आम्ही याच राज्याचे नागरिक आहोत आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्यांनाच तो अधिकार आहे? असाही प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. आम्ही कझाकिस्तान आणि युगोस्लेव्हियातून आलो नाहीत असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

Related Post