Fri Nov 22 04:13:05 IST 2024
नाशिक : राज्यात आज नाशिकसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याअगोदरच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील निफाड सिन्नर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. अवकाळी पावसामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऐन हिवाळ्यात नाशिक जिल्ह्यात सह राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा पावसाचं काही ठिकाणी आगमान झालं आहे. विजांच्या कडकडटासह अनेक भागात पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे नागरिकांना ऐन हिवाळ्यात छत्री आणि रेनकोट आता बाहेर काढले आहेत तर पावसामुळे गारवा देखील दुपटीने वाढला आहे. हवामान विभागाने २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. दरम्यान , हवामान खात्याने आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.हिवाळी मोसमी वारे व चक्रीय सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली तर निफाड तालुक्यात जोरदार गारपीट झाली या गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण दिसत आहे. या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असल्याचे म्हटलं जात असले तरी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता दिसून येत आहे रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास नाशिक शहरात पुन्हा एकदा ढग दाटून येऊन वातावरण अंध:कारमय झाले. यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सिन्नरसह , मनमाड, निफाड आदी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. चांदवड, निफाड आणि मनमाड या पट्ट्यास गारपीटीचा तडाखा बसल्याने कांदा , द्राक्ष आदी पिके संकटात सापडली आहेत.