नागपूर प्रदूषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल, एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-27 19:37:06.0
img

नागपूर : संपूर्ण जगापुढे सध्या प्रदूषण हे सर्वात मोठे संकट आहे. अशात कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागपूरची आता प्रदूषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते नागपूर महानगरपालिकेद्वारा आयोजित एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे १००० मे. टन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारणी आणि देखभाल दुरूस्ती प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. घनकचरा प्रक्रिया केंद्र परिसर, बिडगाव रोड भांडेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नेदरलँडचे महावाणिज्यदूत श्री. बार्ट डी जोंग, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीचे संस्थापक श्री. बर्ट जगेल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जाप विनेंबोस, संचलक श्री. केदार वझे, एआरसीचे जेव्ही पार्टनर चेअमन श्री. प्यारे खान, ससबीडीच्या कार्यकारी संचालक श्रीमती वृंदा ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करीत प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. उपस्थिताना मार्गदर्शन करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा 'वेस्ट टू वेल्थ' आणि 'नॉलेज टू वेल्थ' या दोन्ही सिद्धांताना सुसंगत असा आहे. या प्रकल्पामुळे नागपूरचा विकास होईल आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे उत्तम उदाहरण देशापुढे उभा करेल. सॉलिड वेस्ट वेगळे करून त्यातून खत निर्मिती, सीएनजी गॅस, एलएनजी गॅस, प्लास्टिक पासून इंधन तयार करता येईल. त्यामुळे हा प्रकल्प प्रदूषण मुक्तीसाठी महत्वाचा ठरेल. प्रकल्पाद्वारे मनपाची मोठी बचत होईल आणि दरवर्षी आर्थिक उत्पन्न मिळेल. या प्रकल्पातून निघणाऱ्या सीएनजीचा वापर मनपाच्या बसेस मध्ये करण्याची सूचना त्यांनी केली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रदुषणामुळे वातावरणात बदल दिसून येत आहे. या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांची आवश्यकता आहे. या प्रकल्पात नेदरलँड सारख्या ख्यातनाम देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. या अत्याधुनिक व नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांची उणीव भरून निघेल आणि या प्रकल्पामुळे नागपूर शहर हे देशपातळीवर सस्टेनेबल शहर म्हणून नव्याने उदयास येईल. तसेच कचऱ्यापासून प्रदूषणमुक्त संपत्तीचा निर्माण करणारा हा प्रकल्प सर्क़ुलर इकोनॉमीचे उत्तम उदाहरण बनेल व शहराला प्रदूषण मुक्त करून देशाच्या विकासात मोठे योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय राज्यात सर्क़ुलर इकोनॉमीक पार्क तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गत दहा वर्षात नागपूरचा सर्वांगीण विकास झाल्याचे दिसून येत असून, बाहेरून आलेल्या नागरिकांना नागपूरचा बदललेला चेहरा बघून आश्चर्य वाटत असल्याचे श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्य शासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले ते म्हणाले की, नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणा-या कच-यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता M/s. SusBDe नागपूर महानगरपालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करणार आहेत. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार M/s. SusBDe यांना देण्यात आले आहेत. बाय-प्रोडक्टच्या विक्रीमधून होणाऱ्या उत्पन्नातून प्रथम रु. 15 लक्ष प्रतिवर्ष मनपाला प्राप्त होणार आहेत. तसेच देखभाल व दुरुस्ती कालावधीत वाढीव रॉयल्टी देण्याबाबत कंपनीने सादर केले आहे. सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, Dry Fermentation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी कालावधी मध्ये या जागे व्यतिरिक्त 9 एकर जागा Fresh Waste Processing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. 18 महिन्याची दिलेल्या कालावधी मध्ये हा प्रकल्पाला पूर्ण होईल. या प्रकल्पात ठिकठिकाणचा कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या कचरा वेचणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश करण्यात येणार आहे. असे सांगितले. सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीच्या श्रीमती वृंदा ठाकूर यांनी प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, सहायक आयुक्त गणेश राठोड, घनश्याम पंधरे, माजी नगरसेवक बंटी कुकडे, बाल्या बोरकर, धर्मपाल मेश्राम, विजय (पिंटू) झलके, मनीषा कोठे, समिता चकोले, मनीषा वैद्य, दीपक वाडीभस्मे आदी उपस्थित होते.

Related Post