Fri Nov 22 03:56:54 IST 2024
लॉस एंजेल्स : सूर्यस्नान आणि पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व ड घेण्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होत असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.
अहारामध्ये चरबीयुक्त पदार्थाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे चयापचाय सिंड्रोममध्ये वाढ होऊ शकते. या सिंड्रोमच्या वाढीसाठी जीवनसत्त्व ड ची शरीरातील कमतरता कारणीभूत ठरते. त्यामुळे शरीरातील गट जिवाणू (आतडय़ातील सूक्ष्मजीव) अस्थिर होतात, असे संशोधकांना आढळून आले. अभ्यासानुसार, जीवनसत्त्व ड चे शरीरातील प्रमाण पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. जीवनसत्त्व ड ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यस्नान, पूरक अहार घेणे आवश्यक असल्याचे अमेरिकेतील सिन्हाई आरोग्य केंद्राचे स्टिपेन पॅन्डोल यांनी म्हटले आहे.
जगातील जवळपास एकचथुर्ताश प्रौढांवर चयापचाय सिंड्रोमचा परिणाम होतो. तसेच तो मधुमेह आणि हृदयरोग होण्यासाठी मोठा धोका आहे. अतिस्थूलतेच्या लक्षणांसह रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, उच्च रक्तदाब अथवा उच्च कोलेस्ट्रॉल ही याची लक्षणे आहेत. चयापचायाचा सिंड्रोम होण्यासाठी जीवनसत्त्व ड ची शरीरातील कमतरता कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले. जीनवसत्त्व ड च्या कमतरतेमुळे आतडय़ातील जिवाणूंचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जीनवसत्त्व ड असलेला पूरक अहार घेणे आवश्यक आहे. हे संशोधन फ्रंटियर्स फिजिओलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.