Fri Apr 04 06:54:00 IST 2025
ठाणे : आज पहाटे ठाणे, पुणे, भिवंडीतील पडघा येथे एनआयच्या पथकांनी छापे टाकले. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. या छाप्यांवेळी एनआयएने तब्बल १५ लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. छापेमारीदरम्यान एनआयएने काही लोकांकडून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. हे सर्वजण देशात बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत होते.
आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापे टाकण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडीसह देशभरात तब्बल ४४ ठिकाणी एनआयएच्या पथकांनी मोठ्या फौजफाट्यासह छापासत्र राबवले. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला व अतिफ नाचन यांना पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भिवंडीतील पडघा हे गाव एनआयएच्या रडारवर होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने पुन्हा छाप टाकून आणखी काहीजणांना ताब्यात घेतले. भिवंडीत सुध्दा एनआयएच्या पथकांकडून कारवाई सुरु आहे. शहरातील तीनबत्ती ,शांतीनगर व इस्लामपूरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याशिवाय, कर्नाटक आणि बंगळुरुतही छापेमारी करण्यात आली. पडघा नजीकच्या बोरिवली गावात एनआयएने कारवाई केली. गावातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईवेळी गावात ठाणे ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
अल-कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांकडून देशात कट्टर विचारसरणीला प्रोत्साहन देत हिंसाचार घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा एनआयएला संशय आहे. दहशतवादी संघटनांनी देशात इस्लामिक सत्ता स्थापन करण्यासाठी धार्मिक वर्ग आयोजित केले होते. त्यामध्ये तरुणांच्या मनात विष पेरत दहशतवादी गटात भरती केले होते. त्यानंतर एनआयएकडून छाप्यांचं सत्र सातत्यानं सुरू आहे. आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयएने) दहशतवाद्यांकडून घातपात होण्याच्या शक्यतेनं मोठी कारवाई केली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ४४ ठिकाणी छापे टाकले आहेत. भिवंडीतही एनआयएकडून कारवाई सुरू आहे. शहरातील तीनबत्ती, शांतीनगर आणि इस्लामपूरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर महाराष्ट्रातील कारवाईत एकूण १३ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.