कांद्याचा लिलाव ठप्प

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-12-09 11:47:54.0
img

नाशिक : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने सकाळपासून लासलगावसह जिल्ह्यातील विविध भागात कांदा लिलाव ठप्प झाले असून शेतकरी रस्त्यावर उतरल्याने चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर एक तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको करण्यात आला.

चांदवडला माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन संपल्यावर नेते व स्थानिक आंदोलक शेतकरी निघून गेले. त्यानंतर पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असताना कांदा विक्रीसाठी बाहेरगावाहून आलेल्या तरुण शेतकऱ्यांनी पुन्हा वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. या तरुणांना पोलिसांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना रस्त्यावरून पिटाळले आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे आज सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फटका बसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे.

Related Post