Fri Apr 04 07:07:25 IST 2025
मुंबई : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर केंद्र सरकारने आता संपूर्ण कुस्ती संघटनेलाच बरखास्त करुन संजय सिंह यांना निलंबित केले आहेत. त्यामुळे यापुढे संजय सिंह हे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया अध्यक्ष राहणार नाहीत.
भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यामध्ये कुस्तीपटू अनिता शेओरान यांचा पराभव झाला होता. या निकालानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होता. आता सरकारने नव्या कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे. कुस्ती संघटना रद्द करतानाच क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही दिली आहे. यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता नुकत्याच झालेल्या कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत विजयी झालेले संजय सिंग यापुढे अध्यक्ष राहणार नाहीत. कारण सरकारने संपूर्ण कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे. कुस्ती संघटनेची ही निवडणूक वैध नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. नियमानुसार भारतीय कुस्ती संघाची निवड झालेली नाही. नूतन अध्यक्ष संजय सिंह यांचे सर्व निर्णय स्थगित करण्यात आले आहेत.
क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईबाबत बजरंग पुनियानेही प्रतिक्रिया दिली आहे, "मला अद्याप याबाबत माहिती नाही. जर हा निर्णय घेतला असेल तर तो अगदी योग्य आहे. जे आपल्या बहिणी आणि मुलींच्या बाबतीत घडत आहे. अशा लोकांना सर्व महासंघातून काढून टाकले पाहिजे," असे बजरंग पुनियाने म्हटलं आहे. दरम्यान, भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या नवनियुक्त अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठा निर्णय घेतला होता. कुस्तीपटू साक्षी मलिकने माजी अध्यक्ष ब्रृजभूषण सिंग यांचे व्यावसायिक भागीदार आणि जवळचे सहकारी संजय सिंह यांच्या निषेधार्थ कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर बजरंग पुनियाने साक्षी मलिकच्या समर्थनार्थ पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला होता.