Fri Apr 04 06:53:11 IST 2025
नवी दिल्ली : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team Head Coach) म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या बाबत अधिकृत घोषणा केली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी 20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.
जय शाह यांनी गौतम गंभीर यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याची घोषणा करताना आनंद होत असल्याचं म्हटलं. गौतम गंभीर यांचं भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करत आहे. आधुनिक क्रिकेट वेगानं विकसित होत आहे. गौतम गंभीर या बदलांचा साक्षीदार आहे. गौतम गंभीरनं त्याच्या कारकिर्दीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विविध पदांवर काम केलं आहे. गौतम गंभीर भारताच्या प्रशिक्षक पदासाठी योग्य व्यक्ती आहे. तो भारताचं क्रिकेट पुढे नेईल, असं जय शाह म्हणाले.
गौतम गंभीर यांच्याकडे भारतीय क्रिकेट संघासाठी स्पष्टपणे व्हिजन आहे. याला गौतम गंभीरच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि विविध पदांवर काम केल्याची जोड देखील आहे. यामुळं भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदावर काम करण्यासाठी गौतम गंभीर योग्य ठरतो. बीसीसीआयचा गौतम गंभीरला पुढील प्रवासासाठी पूर्ण पाठिंबा असल्याचं जय शाह म्हणाले. राहुल द्रविडनं आयसीसी वनडे वर्ल्ड कपनंतर मुख्य प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रोहित शर्माच्या विनंतीनंतर त्यानं टी 20 वर्ल्डकप पर्यंत पदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं राहुल द्रविडला 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली होती. मात्र, राहुल द्रविडनं नकार दिल्यानंतर नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु झाला होता. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गौतम गंभीरला भारताचं मुख्य प्रशिक्षक पद सोपवण्यात आलं आहे.