Fri Nov 22 04:37:01 IST 2024
मुंबई : IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची (Medical Examination) कागदपत्रं अखेर सापडली आहेत. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रं सापडली आहेत.
यावर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणारे. त्यावेळी त्यांना ही कागदपत्रं सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिलीये. पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकरने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीही नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं अशी माहिती समोर आलीय. पूजा खेडकर यांनी 2007 मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी ऍडमिशन घेतलं होतं. यावेळी NT - 3 म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून ऍडमिशन घेतलं होतं. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असेल तरच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देण्यात येतं. मात्र त्यांनी मेडिकल प्रवेशासाठीही नॉन क्रिमीलेअरचा वापर केल्याचं स्पष्ट होतंय.
दरम्यान मेडिकल प्रवेशावेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं. काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकरांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी कुठल्याच स्वरूपात दिव्यांग नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी मात्र त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या अशी माहिती समोर आलीय. दरम्यान, पूजा खेडकरांनी पुण्यातील जिल्हा रुग्णालयातून देखील अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शारीरिक दृष्ट्या विकलांग म्हणजेच कुठल्यातरी व्यंगाच्या कारणावरून हालचालींवर मर्यादा येत असल्याबाबतचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची 23 ऑगस्ट 2022 रोजी वैद्यकीय तपासणी झाली त्यानंतर 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची विनंती फेटाळण्यात आल्याचं त्यांना औंध जिल्हा रुग्णालयाकडून लेखी कळवण्यात आलं.