Fri Nov 22 04:18:21 IST 2024
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज (सोमवारी) सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver Oak) येथे दाखल झाले. छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवार(Sharad Pawar) यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.
भेटीवर उमेश पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. शरद पवार (Sharad Pawar) देखील राज्यासह देशातील मोठे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी छगन भुजबळ यांना विचारून जाण्याची आवश्कता नाही. राज्यात अनेकदा वेगवेगळ्या पक्षांचे नेते भेटायला जातात. ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आता वेगळी भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याआधी आम्ही निर्णय घेण्याआधी त्याची संपुर्ण कल्पना शरद पवारांना होती असं देखील उमेश पाटलांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवारांबाबत (Sharad Pawar) कोणत्याही प्रकारची कटुता आमच्या कोणत्याही नेत्यांच्या मनामध्ये नाही आणि कधी नव्हती. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे दैवत आहेत. याचा उल्लेख आम्ही करतो देखील आणि आम्ही त्यांना दैवत मानतो देखील, त्यामुळे शरद पवारांना भेटण्यासाठी छगन भुजबळ गेले त्याचा वेगळा काही अर्थ घेण्याची गरज नाही.
आम्ही सरकारमध्ये आहोत ते विरोधात आहेत. त्या दृष्टीकोनातून आम्ही एकमेकांवर टीका करतो. आपल्या भूमिका पटवून देताना टीका-टिपण्णी होत असते. याचा अर्थ एकमेकांना भेटू नये असा होत नाही. शरद पवारांना भेटण्यामध्ये काही अडचण नाही त्यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही उमेश पाटील पुढे म्हणाले आहेत.