Sun Nov 24 11:33:56 IST 2024
मुंबई : भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळेनं इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत स्वप्निलनं कांस्य पदकाची कमाई केली आहे.
एकूण ४५१.४ गुण मिळवत त्याने कांस्य पदकाला गवसणी घातली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेला आता राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे. तर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटलांनी त्याच्यावर कौतुकाची थाप देत पाच लाख रूपयांचा इनाम जाहीर केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्वीट (एक्स) करत कौतुक केलं आहे. ते म्हणाले आहेत की, '' पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील आपल्या उत्तुंग यशामुळे स्वप्नीलने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली..! पॅरीस ऑलिंपिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांशी आज मंत्रालयातील दालनातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कुसाळे कुटूंबियांचे अभिनंदन केले. स्वप्नीलने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्नीलच्या नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे यावेळी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना सांगितले. कुसाळे कुटुंबियांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहचू शकला आहे. त्याच्या गेल्या १२ वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळाले आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, स्वप्नीलला शालेय जीवनापासून ते नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणारे सर्व गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्वाचे असल्याचे सांगून या सर्वांचे अभिनंदन केले. स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं. हे पदक महाराष्ट्रासाठी खास आहे. कारण १९५२ साली खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये, कुस्तीत ऐतिहासिक ब्राँझ मेडल जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रासाठी अशी भरारी घेतलीय ती कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने अन् तेही तब्बल ७२ वर्षांनी.