Sun Nov 24 13:03:46 IST 2024
बांगलादेश : शेरपूर जिल्ह्यात असलेल्या तुरुंगावर जमाव चाल करुन गेला. त्यांनी ५०० कैद्यांना तुरुंगातून पळवलं. देशभरात संचारबंदी लागू असताना जमाव लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरला. त्यांनी मिरवणूक काढली. जमावानं दमदमा-कालीगंजमधील जिल्हा कारागृहावर हल्ला चढवला. आंदोलकांनी तुरुंगाचा गेट तोडून आग लावली.
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांगलादेशमधील हिंसाचार सुरुच आहे. आता उपद्रवी अल्पसंख्याक हिंदूंसह शेख हसीनांच्या अवामी लीगच्या समर्थक आणि त्यांच्या कार्यालयांना लक्ष करत आहेत. सोमवारी जेसोरमध्ये आंदोलकांनी एक हॉटेल पेटवलं. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून ८४ जण जखमी झाले. आंदोलकांनी पेटवून दिलेलं हॉटेल अवामी लीगचे नेते शाहीन चकलादार यांचं आहे. चकलादार जेसोर जिल्ह्याचे अवामी लीगचे महासचिव आहेत. उपायुक्त अबराऊल इस्लाम यांनी आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मृतांमधील दोघांची ओळख पटली आहे. २० वर्षीय चयन आणि १९ वर्षीय सेजन हुसेन यांचा हॉटेलला लावण्यात आलेल्या आगीत मृत्यू झाला. आगीत ८४ जण जखमी झाले असून त्यातील बहुतांश जण विद्यार्थी आहेत.
बांगलादेशमधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या डेली स्टारच्या वृत्तानुसार, देशातील हिंदूंवर हल्ले होत आहेत. काल किमान २७ जिल्ह्यांमध्ये जमावानं हिंदूंच्या घरांवर आणि दुकानांवर हल्ले केले. त्याच्या मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या. थाना रोडवर परिसरात वास्तव्यास असलेल्या नगरपालिका सदस्य मुहिन रॉय यांच्या कॉम्प्युटर दुकानात तोडफोड करण्यात आली. काहींनी दुकान लुटलं. याशिवाय कालीगंज उपजिल्ह्यातील चंद्रपूर गावात चार हिंदू कुटुंबांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. अवामी लीगचे खासदार काजी नबील यांच्या निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली. घराला आग लावण्यात आली. बांगलादेशचा क्रिकेटपटू लिटन दास आणि माजी कर्णधार मुशरफी मुर्तजा यांची घरंदेखील पेटवण्यात आली. मुर्तजा अवामी लीगचा नेता आहे. जानेवारी झालेली सार्वत्रिक निवडणूक लढवून मुर्तझा खासदार झाले. तर लिटन दास बांग्लादेश क्रिकेट संघात यष्टीरक्षक आणि सलामीवीर आहे. दास अल्पसंख्याक हिंदू समाजातील आहे.