Fri Nov 22 03:54:58 IST 2024
नागपूर : अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या एका मुलीचा जीव कुणाल चौधरी या तरुणाने जीवाची पर्वा न करता वाचविले. त्याच्या कार्याची दखल घेत नागपूर पोलीस आयुक्त यांनी त्या तरुणाचे कौतुक करून सत्कार केला.
पोलिस ठाणे अंबाझरी अंतर्गत फुटाळा तलाव येथे दि. १६/०८/२०२४ रोजी दुपारी ०१.२५ वा. एक अठरा वर्षाची मुलगी फुटाळा तलावात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्नात दिसत आहे अशी माहिती पोलीस ठाणे अंबाझरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गोल्हे यांना प्राप्त झाली. त्यांनी अंबाझरी तलावाकडे पेट्रोलिंग करणारे बिट मार्शल यांना तात्काळ जाण्यास सांगितले. बीट मार्शल हे घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी बीट मार्शल यांना एक तरुण नामे कुणाल चौधरी वय २० वर्ष, रा. हजारी पहाड गिट्टीखदान हा उभा दिसला. तरुणाने बिट मार्शल यांना सांगितले की, एक मुलगी ही मागील एक तासापासून तणावग्रस्त आणि जास्त विचार करीत असून तिचे हावभाव व्यवस्थित वाटत नाही. सदर मुलगी ही फुटाळा तलावाच्या भिंतीवर उभी होती. काही क्षण जात नाही तोच बीट मार्शल व तरुणाला ती मुलगी आयुष्य संपवण्याच्या इराद्याने तलावात उडी मारताना दिसली. तेव्हा कुणाल याने क्षणाचा विलंब न करता तात्काळ पाण्यात उडी मारली . ती मुलगी गटांगळ्या खात असताना तिला पाण्याच्या बाहेर सुखरूप काढले. बीट मार्शल व त्या तरुणाने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या मुलीला आस्था पूर्वक विचारपूस केली व स्थानिकांच्या मदतीने समुपदेशन करून समजूत काढली. सदर प्रकरणाची दखल म्हणून आज दि. २०/८/२०२४ रोजी सायं.५.०० वा मा. पोलीस आयुक्त यांनी तरुण मुलगा कुणाल चौधरी व अंबाझरीचे बीट मार्शल यांना पोलीस भवन येथे स्वतःच्या कार्यालयात बोलावले. तरुणाची आस्था पूर्वक विचारपूस केली. कुणाल चौधरी हा हजारी पहाड येथे राहत असून आठवी शिकलेला आहे. शिक्षणात पुढे ओढ नसल्याकारणाने तो चायनीजच्या ठेवल्यावर काम करीत असल्याचे त्याने सांगितले. पोलीस आयुक्तांनी त्याला त्याच्या उदरनिर्वाह बाबत व भविष्यात पुढे काय करणार असे आपुलकीने विचारले. विचारपूस दरम्यान कुणाल चौधरी याने पोलीस आयुक्त यांना सांगितले की, त्याने यापूर्वी देखील ६ जणांना अंबाझरी तलाव येथे पाण्यात बुडून आयुष्य संपवणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचवले आहे . यावेळी पोलीस आयुक्त यांना भारावून आले व त्यांनी कुणाल चौधरीच्या शौर्याबद्दल त्याच्या या कार्याबाबत पोचपावती म्हणून ५०००/₹ चे रोख रकमेचे बक्षीस त्वरित दिले.
अशाप्रकारे तलावात उडी मारणाऱ्या मुलीचा जिव वाचविण्याच्या कार्याबद्दल तरुण कुणाल चौधरी या मुलाचे व सदर कार्याकरिता अंबाझरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोल्हे व बीट मार्शल यांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक केले. त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरीमुळे पोलिसांची जन माणसात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्यामुळे मा. पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या दालनात सर्वांना प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.