क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो कालवश

2016-11-26 17:58:42.0
img

क्युबा : क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि महान क्रांतिकारक नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन झाले. वयाच्या 90 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्थानिक मीडियाने त्यांचे भाऊ राऊल कॅस्ट्रो यांच्या हवाल्याने फिडेल यांच्या निधनाच्या बातमीला पुष्टी दिली.

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला एकहाती धूळ चाखायला लावणारे धाडसी क्रांतिकारी नेता म्हणून फिडेल यांना ओळखले जाते. क्युबामधील ओरिएंट प्रांतात 13 ऑगस्ट 1926 रोजी कॅस्ट्रो यांचा जन्म झाला. यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली. गेल्या 10 वर्षांपासून प्रकृती ठीक नसल्याच्या कारणामुळे ते सत्तेपासून दूर होते. त्यांच्यानंतर त्यांचे भाऊ राऊल कॅस्ट्रो क्युबाची सत्ता सांभाळत होते. क्युबा क्रांतीचे प्रमुख नेता म्हणून फिडेल कॅस्ट्रो यांची ओळख.

फेब्रुवारी 1959 ते डिसेंबर 1976 पर्यंत फिडेल यांनी क्युबाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर ते क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले. फेब्रुवारी 2008 साली त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यापूर्वी 2006 सालीच त्यांनी आपल्या भावाकडे क्युबाची सत्ता सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती. फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबा क्रांतीच्या माध्यमातून फुल्गेकियो बॅतिस्ता यांच्या हुकुमशाहीला मुळापासून उपटून बाहेर फेकले आणि ते सत्तेवर आले. या घटनेनंतर ते क्युबाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. यामुळेच फिडेल कॅस्ट्रो अमेरिकेच्या निशाण्यावर होते. फुल्गेंकियो बॅतिस्ता यांना अमेरिकासमर्थित नेता मानले जायचे.

Related Post