Sun Nov 24 13:33:35 IST 2024
सेऊल : दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन यांच्या कार्यालयात वायग्रा गोळया सापडल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत. विरोधी पक्षाच्या खासदाराने आरोप केल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने डिसेंबर महिन्यात वायग्रा गोळयांची खरेदी केल्याचे मान्य केले.
उंचावरील प्रदेशात गेल्यानंतर होणा-या आजारांसाठी या गोळयांची खरेदी करण्यात आली होती. पार्क ग्युन इथिओपिया, युगांडा आणि केनियाच्या दौ-यावर जाणार होत्या. या तिन्ही देशांच्या राजधान्या उंच प्रदेशात आहेत त्यावेळी राष्ट्राध्यक्षांचे सहकारी, कर्मचा-यांना कुठला त्रास उदभवल्यास खबरदारी म्हणून या वायग्रा गोळया विकत घेण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले.
या गोळयांचा वापर झालेला नाही अशी माहिती ब्ल्यू हाऊसचे प्रवक्ते जंग युउन कुक यांनी दिली. दक्षिण कोरियातील डॉक्टर गिर्यारोहणासाठी जाणा-या गिर्यारोहकांना अनेकदा अशा प्रकारच्या वायग्रा गोळया लिहून देतात असे जंग यांनी सांगितले.